15 वर्षीय मुलगी 12 वर्षाच्या मुलासोबत ‘फरार’

नोएडा : नोएडा येथील एका १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीने घरच्यांची आणि पोलिसांची डोकेदुखी वाढवली आहे. घरा शेजारी राहणाऱ्या एका १२ वर्षांच्या मुलासोबत ही मुलगी फरार झाली आहे. या पूर्वी दोन वेळा ही मुलगी या मुलासोबत पळून गेली होती.
मात्र, पोलिसांनी दोन्ही वेळेला मुलीचा व मुलाचा शोध घेऊन तिला परत पालकांच्या स्वाधीन केले होते. मात्र, पुन्हा ही मुलगी मुलासोबत फरार झाली आहे.
नोएडाच्या सेक्टर ५८ मधील बिशनपुरा गावात ही घटना घडली. मुलीच्या वाईट सवयीमुळे कुटुंब नोएडा सोडून बिहारला जाण्याच्या तयारीत असताना अल्पवयीन मुलगी ही घरातून पळून गेली. वडील रिक्षा नेण्यासाठी बाहेर गेले असताना यावेळी आई आणि लहान बहिणीला चकवा देऊन ती घरातून गायब झाली. शेजारी राहणारा १२ वर्षांचा मुलगा देखील घरातून बेपत्ता आहे. त्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांनी पुन्हा एकदा पोलिसांत धाव घेतली असून या मुलीचा शोध घेण्यासाठी पुन्हा एकदा पोलिस गुंतले आहेत.
मूळचा बिहारच्या दरभंगा जिल्ह्याचा रहिवासी असलेल्या तिच्या वडिलांनी सांगितले की, त्याला दोन मुली आहेत. मोठी मुलगी १५ वर्षांची तर धाकटी मुलगी १२ वर्षांची आहे. सुमारे ४ वर्षांपूर्वी ते मुलींना शिकवण्यासाठी नोएडाला आले होते. बिशनपुरा येथे खोली भाड्याने घेऊन ते या ठिकाणी राहत होते. पती-पत्नी एका खासगी कंपनीत काम करत असून कष्ट करून दोन्ही मुलींना शिकवत आहेत.