इम्तिजाय जलील यांची भेट घेतल्यावर मनोज जरांगे म्हणतात, हुकमी पत्ते लगेच ओपन करायचे नसतात!
जालना : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.
भेटीनंतर उभय नेत्यांच्या चर्चेवर माध्यमांनी जरांगे यांना विचारले असता राजकारणात हुकमी पत्ते लगोलग टाकून फायदा नसतो. हुकमी पत्ते वेळ आल्यावर टाकायचे असतात, असे सूचक वक्तव्य जरांगे यांनी केले. तसेच येत्या विधानसभा निवडणुकीत मुस्लीम-मराठे हातात हात घालून आरक्षणप्रश्नासाठी एकत्र येताना दिसतील, असे संकेतही त्यांनी दिले.
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर होऊन उणेपुरे दोन तासही होत नाही तोपर्यंच एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी अंतरवाली सराटीत येऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीतील सामाजिक आणि राजकीय समीकरणांवर चर्चा झाल्याचे जलील आणि जरांगे पाटलांनी सांगितले. प्रस्थापितांना घरी बसविण्याचे आमचे लक्ष्य असल्याचेही त्यांनी सांगितले.
जलील यांच्या भेटीवर जरांगेंना विचारले असता ते म्हणाले, राजकारणात हुकमी पत्ते उघडायचे नसतात. बुद्धिबळाचा पट मांडून चालत नाही, खेळताही आले पाहिजे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत तुम्हाला भेटीसंदर्भातील परिणाम लक्षात येतील.
जरांगे जलील निवडणुकीत एकत्र दिसतील का असे विचारले असता- जनतेसाठी काहीही होऊ शकते. सामान्यांच्या अन्यायाला वाचू फोडण्यासाठी आम्ही नक्कीच एकत्र येऊ शकतो. आम्हाला आमदार खासदार व्हायचंय म्हणून आम्ही एकत्र येतोय, असे नाही, असे जरांगे यांनी सांगितले.
जलील म्हणाले, एक मराठा लाख मराठा म्हणत मराठ्यांनी महाराष्ट्र गाजवला. मी जरांगे पाटलांचा फॅन आहे. समाजाच्या हितासाठी एक सामान्य माणूस लढतो, याचे उत्तम उदाहरण जरांगे पाटील आहेत. कितीही दबाव आला तरी त्यांनी भूमिका बदलली नाही. ते समाजाच्या हितासाठी लढत आहेत. त्यांच्या वतीने काही लोक निवडणूक लढणार असल्याचे मला कळाल्याने त्याच अनुषंगाने मी त्यांना भेटलो. चाय पे चर्चा केली. एकत्र येणार की नाही याचा निर्णय काहीच दिवसांत होईल. मी माझ्या पक्षाकडून एकटा निर्णय घेऊ शकत नाही.
जनतेचा प्रस्थापित नेत्यांवरचा विश्वास उडालाय. त्यामुळे नवे चेहरे देण्याची गरज आहे. बाप मंत्री-लेक आमदार, अशी घराणेशाही संपली पाहिजे. घराणेशाहीला संपविण्यासाठी एकत्र यावे लागेल, असे जलील म्हणाले.
बुद्धिबळाचा पट मांडलेला असताना तुम्हाला कोणत्या राजाला मारायचंय असे विचारले असता, आम्ही राजाची नव्हे तर प्रजेची गोष्ट करतो आहे. समाजावर अन्याय होत असल्याने जरांगे लढतायेत. सगळे राजकारणी मराठा आरक्षणासाठी तयार आहेत मग मराठा आरक्षण कुणी अडवलंय? आमच्या समाजाला देखील आरक्षण हवे आहे. या मुद्द्यावर आम्ही एकत्र येऊन भेटलो.
भारतीय जनता पक्षाची नीती लोकांना समजली आहे. मी केवळ फडणवीस यांना दोष देणार नाही. मराठा समाजाचे आंदोलन दिल्लीत पोहोचता कामा नये, हे भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांनी राज्यातील नेत्यांना सांगितले होते. एकत्र येण्याला समान उदिष्ट असावं लागतं, हे आघाडीचे वैशिष्ट असते. जरांगेंची अनेक भाषणं ऐकलीत, त्यांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही. त्यामुळे त्यांच्यासोबत बोलणे गरजेचे होते. प्रस्थापितांना आम्ही संपवू शकतो, असेही जलील म्हणाले.