विधानसभा निवडणुकीदरम्यान राज्यात 7 दिवस ड्राय डे!
मुख्य निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यात आली. 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होतील तर 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत.
यंदा महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच कोणत्या दिवशी ड्राय डे असेल हेदेखील स्पष्ट झाले आहे.
कोणत्या दिवशी असणार ड्राय डे?
महाराष्ट्रात 1 नोव्हेंबरला दिवाळीनिमित्त, 12 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशीनिमित्त तर 15 नोव्हेंबरल गुरू नानक जयंती निमित्त ड्राय डे आहे. तर 18 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावतील, तेव्हापासून ते 20 नोव्हेंबरला मतदान पार पडेपर्यंत राज्यातील दारूची दुकानं बंद राहतील. 23 नोव्हेंबरला निवडणुकीचे निकाल असल्यामुळे त्यादिवशीदेखील ड्राय डे असणार आहे.
ड्राय डे का ठेवला जातो?
राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी मतदारांना लाच देण्यासाठी दारूचा वापर करू नये, यासाठी निवडणूक आयोगाने मतदानाच्या 48 तास आधी म्हणजेच 2 दिवस आधी ड्राय डे घोषित केला जातो. तसा नियमच बनवण्यात आला आहे. या नियमानुसार मतदारांना आमिष म्हणून दारू सेवन आणि वितरण रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात दारूची दुकानं बंद ठेवली जातात.