‘भारतावर दुप्पट कर लादणार’, डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी; वाचा. नेमका काय होणार भारतावर परिणाम?
अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले असून, या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यात प्रमुख लढत होणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. त्या काळात त्यांनी अमेरिकन वस्तूंवर भारताने लावलेल्या करावर अनेकदा टीका केली होती. आता त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या निवडणूक प्रचारात हा मुद्दा उपस्थित केला आहे.
काय होणार भारताच्या जीडीपीवर परिणाम
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण राष्ट्राध्यक्ष झाल्यास भारतीय वस्तूंवरील कर दुप्पट करू, असे म्हटले आहे. तसेच, चिनी वस्तूंवरही अधिक कर लादणार असल्याचे ट्रम्प म्हणाले. असे झाल्यास भारतावर काय परिणाम होतील? याबाबत आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. ब्लूमबर्ग इकॉनॉमिक्सच्या मते, ट्रम्प टॅरिफचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम होणार नाही. जर ते पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाले आणि भारत, चीन आणि ब्राझीलसारख्या देशांवर नवीन कर लादले तर भारताचा जीडीपी २०२८ पर्यंत केवळ ०.१ टक्क्यांनी खाली जाईल. असेही ब्लूमबर्ग इकॉनॉमिक्सने म्हटले आहे.
व्यापारात काहीशी घट होणार
तर चीनमध्ये तयार झालेल्या वस्तूंवर ६० टक्के कर आणि इतर देशांवर २० टक्के कर लावणार असल्याचे ट्रम्प म्हणाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करताना भारत खूप जास्त कर आकारतो असेही ते म्हणाले होते. अहवालानुसार, नवीन कर लागू झाल्यानंतर भारत-अमेरिका व्यापारात काहीशी घट दिसून येईल. असेही ब्लूमबर्ग इकॉनॉमिक्सने म्हटले आहे.
हार्ले डेव्हिडसनवरील करावरून यापूर्वीच वाद
ट्रम्प यांनी हार्ले डेव्हिडसनचे उदाहरण देत सांगितले आहे की, भारताने लादलेल्या जास्त करामुळे कंपनी जास्त वाहने विकू शकली नाही. भारत हा सर्वाधिक कर घेणारा देश असल्याचेही त्यांनी सांगितले. जे देश अमेरिकन वस्तूंवर जास्त कर आकारतात अशा देशांविरुद्ध आम्ही नवीन करप्रणाली आणू. २०१९ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दक्षिण आशियाई देशांच्या यादीतून वगळले होते. जे अमेरिकेला शुल्कमुक्त वस्तू पाठवू शकतात. यानंतर भारतानेही अनेक उत्पादनांवर कर वाढवला. गेल्या वर्षी अमेरिका भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार होता. दोन्ही देशांमध्ये सुमारे १२७ अब्ज डॉलर्सचा व्यापार झाला आहे.