ताज्या बातम्या

‘गेली 99 वर्ष संघाने…’, RSS च्या वर्धापनदिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट, म्हणाले…


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला आज 99 वर्षे पूर्ण होत आहेत. विजयादशमीच्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना संबोधित केलं अन् विजयादशमीच्या कार्यक्रमात ‘शस्त्रपूजा’ केली.

अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आरएसएसच्या वर्धापनदिनानिमित्त पोस्ट केली आहे. संघाचं काम मला कायमच अचंबित करतं, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राज ठाकरे आता शिवसेनेची जागा घेण्याचा प्रयत्न करतायेत का? असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जातोय.

 

राज ठाकरेंनी पोस्टमध्ये काय म्हटलंय?

आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वर्धापनदिन. ९९ वर्ष पूर्ण करत शंभरीत या संघटनेने पदार्पण केलं. याबद्दल प्रत्येक संघ स्वयंसेवकाचं मनापासून अभिनंदन. भारताला आपली मातृभूमी मानणारे सगळे हिंदू आहेत आणि या हिंदू समाजाचे एकत्रीकरण हे उद्दिष्ट घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. भारतीयत्व, राष्ट्रीयत्व, हिंदुत्व याचा अभिमान समाजामध्ये व्हावा यासाठी गेली ९९ वर्ष संघाने निःसंशय मोठं काम केलं आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय.

राज ठाकरेंनी पोस्टमध्ये काय म्हटलंय?

संघाचं काम मला कायमच अचंबित करतं. देशात कोणीतही नैसर्गिक आपत्ती आली तर तिथे तात्काळ धावून जाण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अग्रेसर असतो, हे मी अनेकदा पाहिलं आहे. संघातील बर्‍याच स्वयंसेवक व प्रचारकांशी माझा संवाद आहे. देशाच्या दुर्गम भागांमध्ये जाऊन काम करणं, तिथे भारतीयत्वाची, राष्ट्रीयत्वाची भावना रुजवणं, यांसाठी त्यांना किती संघर्ष करावा लागतो याचा तपशील मला माहित आहे, असंही राज यांनी पोस्टमध्ये म्हटलंय.

 

 

मुळात एका विचाराला घट्ट धरून ठेवत, एखाद्या संघटनेने १०० वर्ष काम करावं हे सोपं नाही. जगाच्या इतिहासात मला नाही वाटत एखादी संघटना १०० वर्ष टिकली असेल आणि तरीही तिचा विस्तार सुरु असेल आणि ती कार्यशील असेल. ही संघटना कायम जागृत ठेवणाऱ्या सर्व संघ स्वयंसेवकांना माझ्या अतिशय मनापासून शुभेच्छा. हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व रुजवण्यासाठी धडपडणारा प्रत्येक घटक, विचार हा असाच तेवत राहू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना, असं राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button