निर्जनस्थळी एकटीच उभी आहे..; मदतीसाठी तरुणीचा फोन, पोलीस पोहोचले पण मुलीला पाहून धक्काच बसला
उत्तर प्रदेशच्या आग्रा पोलिस कंट्रोल रुमला एका मुलीचा फोन आला. या मुलीने पोलिसांकडे मदत मागितली. मी रस्त्यांवर एकटीच उभी असून मला मदत हवीये, असं तिने पोलिसांना सांगितले.
त्यानंतर पोलिसांनी तिला 10 मिनिटांतच तुम्हाला मदत मिळेल असं सांगितले. पोलिसही तातडीने तिथे उपस्थित झाले. मात्र, त्यांनी या मुलीला पाहताच त्यांना धक्काच बसला. पोलिसांनी कधी विचारही केला नसेल अशा व्यक्तीने त्यांना फोन केला होता.
मुलीने पोलिसांच्या कंट्रोल रूमला फोन करुन सांगितले होते की मी निर्मनुष्य स्थळी एकटीच उभी आहे मला भीती वाटतेय. तेव्हा कंट्रोल रूमने म्हटलं की तुमच्या आजूबाजूला कोणी आहे का? तेव्हा मुलीने उत्तर दिले की कोणीच नाहीये. तेव्हा पुन्हा कंट्रोल रूमकडून प्रश्न विचारण्यात आला की, तुम्हाला कुठे जायचंय तेव्हा तिने उत्तर दिलं की, आग्रा कँट रेल्वे स्थानक. कंट्रोल रुमने उत्तर देत म्हटलं की, ठीक आहे तुम्ही तिथेच थांबा आम्ही तुमच्याकडे मदत पाठवतोय. 15 मिनिटांत पोलिस तिच्यापर्यंत पोहोचले.
ही घटना सधारण 11.30 च्या सुमारास घडली असावी. पोलिस तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी पाहिलं की ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून सहाय्यक पोलिस आयुक्त सुकन्या शर्मा या आहेत. सुकन्या शर्मा यांनी पोलिस मदत कक्षाची परीक्षा घेत होती. पोलिसांना 15 मिनिटांचा वेळ दिला होता आणि 15 मिनिटांतच पोलीस आले. टेस्ट रिपोर्टमध्ये सर्वकाही योग्य असल्याचं निदर्शनास आलं. आग्रा सेफ वुमेन झोन बनवण्यासाठी ही चाचणी करण्यात आली होती.
वुमेन सेफ झोन बनवण्यासाठी पोलिस आयुक्त के रविंदर गौड यांनी एक गाइडलाइन जारी केली आहे. गाइडलाइनमध्ये स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत की, रात्री 10 ते सकाळी 6पर्यंत जर महिलांना कोणते वाहन मिळाले नाही आणि त्या महिलेला रेल्वे स्थानक, बस स्थानकात जायचे असल्यास पोलिस कंट्रोल रूम नंबर 112 वर फोन करुन मदत मागू शकता. महिलांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
सहाय्यक पोलिस कमिश्नर सुकन्या शर्मा यांनी सरप्राइज टेस्ट घेऊन पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का दिला आहे. पोलिसही त्यांना घटनास्थळी पाहून आश्चर्यचकित झाले होते. मात्र, सुकन्या शर्मा यांनी घेतलेल्या या परीक्षेत आग्रा पोलिस पास झाले आहेत.