ताज्या बातम्या

आपणच घड्याळ आणि धनुष्यबाणाला हरवलं तर. अमित शाह यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना काय सांगितलं?


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. तसेच विधानसभा निवडणुका कशा जिंकायच्या याचा कानमंत्रही दिला.

 

निवडणुकीत जोमाने काम करा. आपली सत्ता कशी येईल याचा विचार करा. आपणच घड्याळ आणि धनुष्यबाणाला हरवलं तर सत्ता कशी येईल? असा सवाल अमित शाह यांनी केला. अमित शाह यांनी राज्यात सत्तेवर येण्यासाठी प्रयत्नांची पराकष्ठा करण्याच्या सूचनाही कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

 

अमित शाह यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सूचना अत्यंत महत्त्वाच्या आहेत. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अपेक्षित यश न मिळाल्याने कार्यकर्ते थोडे उदास झाले. पण आता आळस झटका. हारजीत होत असते. आता मजबुतीने काम करा. आता विधानसभा निवडणुकीत भाजप आणि मित्र पक्षांचं सरकार आणायचा संकल्प करा. आपणच घड्याळ आणि धनुष्यबाणाला हरवलं तर जिंकणार कोण? असा सवाल अमित शाह यांनी केला.

 

ठाकरे-पवारांच्या कार्यकर्त्यांना गळाला लावा

महाराष्ट्रात भाजपचं पूर्ण बहुमत आणायचं असेल तर विरोधकांची मुळंच कमकुवत करा. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या बुथ लेव्हलच्या कार्यकर्त्यांना भाजपशी जोडा, असे आदेशही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. प्रत्येक कार्यकर्ता महत्त्वाचा असतो. त्याला आपल्याशी जोडून त्याच्या कौशल्याचा उपयोग करून घ्या, असं अमित शाह म्हणाले.

 

तुमचं स्थान कमी होणार नाही

तुम्हाला वाटत असेल बाहेरच्या लोकांना घेतलं तर आपलं स्थान कमी होईल. पण असं होणार नाही. गेली 10 ते 15 वर्ष भाजपशी जोडलेल्या कार्यकर्त्यांना भाजपनं काही दिलं नाही. पण म्हणून पक्ष तुमचं योगदान विसरलाय असं होत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

 

वक्फ बोर्ड कायदा आणणारच

यावेळी अमित शाह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही जोरदार टीका केली. काँग्रेस आणि मित्र पक्षांचे मिळून जेवढे खासदार आहेत, तेवढे एकट्या भाजपचे खासदार आहेत हे राहुल गांधी यांनी समजून घ्यावं. राहुल बाबांनी हे लक्षात ठेवावं की तुमचं हे आयुष्यातील सर्वात मोठं यश आहे. यापुढे भाजप अशी संधी कधीही देणार नाही. राहुल गांधी यांनी कितीही विरोध केला तरी वक्फ बोर्डचा कायदा आणणार म्हणजे आणणारच, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button