कोठडीची शिक्षा सुनावल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; सरन्यायाधीक्ष चंद्रचूड यांना लगावला टोला
शिवसेना ठाकरे गटचे नेते व खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने अब्रुनुकसानीच्या खटल्यामध्ये दोषी म्हणून निर्णय दिला आहे.
शिवडी येथील कोर्टाने हा न्याय दिला असून भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी हा खटला दाखल केला होता. 2022 सालातील या प्रकरणामध्ये संजय राऊतांना दोषी म्हणून या 15 दिवसांची शिक्षा आणि 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या प्रकरणावर आता खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे देखील नाव घेत टोला लगावला आहे.
न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यानंतर खासदार संजय राऊत म्हणाले की, “मीरा-भाईंदर भागात युवक प्रतिष्ठान संस्थेला काही शौचालय बनवण्याची कामं मिळाली. त्यामध्ये घोटाळा , गडबड झाली असा आरोप मी केला नव्हता, तर हा आरोप सर्वात आधी मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील यांनी केला. याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीलं होतं. त्यावर, या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी भूमिका तेथील आमदार प्रताप सरनाईक यांनी मांडली होती. यानंतर त्याबद्दल कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी विधानसभेत चर्चा झाली आणि एक आदेश पारीत झाला. मी बोललो, तर माझ्याकडून मानहानी कशी झाली ? माझा संबंध कुठे आला? मीरा भाईंदर नगरपालिकेचा रिपोर्ट देखील आहे. काहीतरी गडबड, भ्रष्टाचार आहे असे फक्त प्रश्न मी विचारले. मी काही कागद कोर्टासमोर सादर केले. पण संपूर्ण देशात न्यायव्यवस्थेचे संघीकरण झाले आहे, तरीही आम्ही न्यायालयाच्या आदेशाचा आदर करतो,” असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे नाव घेत टोला
पुढे खासदार राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे नाव घेत टोला लगावला आहे. संजय राऊत म्हणाले, “ज्या देशात मुख्य न्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान हे गणपतीत मोदक खायला जातात, तिथे भ्रष्टाचाराविरोधात आणि अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या आमच्यासारख्या लोकांना न्याय कसा मिळेल? हेच अपेक्षित होतं. तरीही मी न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आदर करतो. न्याय मिळेपर्यंत आम्ही लढत राहू. या निर्णायाच्या विरोधात आम्ही नक्की वरच्या कोर्टात जाऊ. मी फक्त जनतेच्या हितामध्ये भूमिका मांडली होती. ती भाजपला झोंबली. विधानसभा निवडणूकींच्यापूर्वी मला तुरुंगात टाकायचं आहे. भ्रष्टाचाराविरोधात आघाडी तयार केल्यामुळे मला तुरुंगात टाकायचं असेल,” असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
हे देखील वाचा : संजय राऊतांना 15 दिवसांची कैद, 25 हजारांचा दंड ही ठोठावला, नेमकं प्रकरण काय?
नेमकं प्रकरण काय?
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी मीरा भाईंदरमधील टॉयलेट उभारणीच्या कामामध्ये घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर या आरोपाचे सबळ पुरावे द्यावेत असे आव्हान किरीट सोमय्या दिले. ते न दिल्यामुळे मात्र मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला होता. 2022 मधील या प्रकरणावर न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली. या अब्रुनुकसानीच्या खटल्यामध्ये न्यायालयाने संजय राऊत यांना 25 हजार रुपये दंड आणि 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. विधानसभा निवडणूकीपूर्वी संजय राऊतांना हा मोठा धक्का बसला आहे.