सज्जन जिंदाल यांचा मोठा निर्णय ! 40,000 कोटींचा ईव्ही प्रकल्प ओडिशातून महाराष्ट्रात हलवणार
JSW समुहाने नवीन पटनायक यांच्या नेतृत्वाखालील बिजू जनता दल सरकारसोबत इलेक्ट्रिक वाहन उद्योग ओडिशामध्ये स्थापन करण्याचा करार केला होता. पण अवघ्या सात महिन्यांनी आपला प्रस्तावित 40,000 कोटींचा इलेक्ट्रिक वाहन (EV) आणि बॅटरी प्रकल्प ओडिशातून महाराष्ट्रात हलवण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.
सज्जन जिंदाल यांच्या नेतृत्वाखालील समूह आता औरंगाबाद आणि नागपूरमध्ये आपला ईव्ही आणि संबंधित प्रकल्प हलवण्याचा विचार करत आहे. पूर्वेकडील राज्यात राजकीय बदल झाल्यानंतर कंपनीने आपल्या योजनांमध्ये बदल केला आहे.
फेब्रुवारीमध्ये, जिंदाल समूहाने ओडिशामधील कटक आणि पारादीप येथे ईव्ही आणि बॅटरी उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी ओडिशा सरकारसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती. कंपनीने मेगा प्लांटसाठी 40,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले होते.
गुजरात आणि महाराष्ट्र ही पश्चिमेकडील राज्ये सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रिक वाहने यांसारख्या सेक्टरमध्ये मोठी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी स्पर्धा करत आहेत.
मोठ्या कंपन्या मोठे प्रकल्प राज्यात आणताना राजकीय स्थिरता आणि सुरक्षितता आहे का याचा विचार करतात. 2008 मध्ये, टाटा समूहाने भूसंपादनाच्या विरोधात हिंसक आंदोलनानंतर टाटा नॅनो तयार करण्याचा नियोजित प्रकल्प पश्चिम बंगालमधून गुजरातमध्ये हलवला होता.
कंपनीने अलीकडेच एमजी मोटर इंडियाची मालकी असलेली कंपनी SAIC मोटर सोबत जॉइंट व्हेंचर करार केला आहे, ज्यात 35% स्टेक आहे. हा उपक्रम इलेक्ट्रिक वाहनांचा आहे. कंपनीने सांगितले की 40,000 कोटींची दोन वेगवेगळ्या टप्प्यात गुंतवणूक केली जाईल. या गुंतवणुकीमुळे 11,000 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.