शारीरिक संबंध न ठेवल्याने मृत्यू, नियमित सेक्समुळे हृदय व कार्डिओव्हॅस्क्युलर हेल्थ चांगली राहते.
लैंगिक संबंध ठेवणं, ही मानवाची नैसर्गिक गरज आहे. सेक्स हा कोणत्याही नात्याचा नैसर्गिक आणि इंटिमेट पैलू आहे. मात्र, याचे काही फायदे आणि तोटे देखील आहेत. याबाबत फारच कमी प्रमाणात माहिती घेतली जाते.
लैंगिक संबंध हा दीर्घकाळापासून जगभरातील अनेक संशोधकांच्या संशोधनाचा विषय आहे. काही संशोधनांमधून सेक्सचे फायदे समोर येत आहेत तर काही संशोधनांमधून भीतीदायक खुलासे होते आहे.
ब्रिटनमधील संशोधकांनी पुरुषांच्या सेक्स लाइफबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. संशोधन अहवालातील माहितीनुसार, जे लोक सेक्सपासून दूर राहतात त्यांचा लवकर मृत्यू होऊ शकतो. आठवड्यातून एकदा सेक्स करणाऱ्या पुरुषांच्या तुलनेत महिन्यातून एकदाही सेक्स न करणाऱ्या पुरुषांना मृत्यूचा धोका जास्त आहे. सेक्स करणं पुरुषांसाठी फायदेशीर आहे. जे पुरुष नियमित सेक्स करतात त्यांना कॅन्सर होण्याचा धोका कमी असतो. ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये हा अहवाल प्रकाशित झाला आहे.
जपानमध्ये देखील लैंगिक संबंधांबाबत एक संशोधन झालं आहे. यात असं निदर्शनास आलं की, लैंगिकदृष्ट्या महिलांमध्ये रस नसलेल्या मध्यमवयीन आणि ज्येष्ठ पुरुषांना आयुर्मान कमी होण्याचा धोका असतो. जपानमधील यामागाता प्रांतात केलेल्या या सर्वेक्षणात 20,000 लोकांनी भाग घेतला होता. यामागाता युनिव्हर्सिटी फॅकल्टी ऑफ मेडिसिन, स्कूल ऑफ नर्सिंगमध्ये ब्रेन ट्युमर एक्सपर्ट असलेले प्रोफेसर काओरी साकुराता हे या संशोधन टीमचे प्रमुख होते. साकुराता म्हणाले, “विरुद्ध लिंगाच्या दोन व्यक्ती एकत्र राहिल्यास आणि त्यांनी एकमेकांशी सतत संवाद साधल्यास मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्यास मदत होते. काहीजणांना जगण्याचं कारण शोधण्यातही मदत होऊ शकते.”
अशाच प्रकारच्या एका संशोधनात ‘लैंगिक स्वारस्यात कमतरता आणि त्याचा मृत्युशी संबंध’ यांचा अभ्यास करण्यात आला. अभ्यासात सात शहरांमध्ये राहणाऱ्या 40 ते 70 वर्षे वयोगटातील 20 हजार व्यक्तींचा समावेश होता. संशोधकांनी त्यांचं सेक्स लाइफ, दिनचर्या आणि मृत्युचा धोका यांच्यातील संबंधांचा अभ्यास केला. त्यातून असं आढळलं की, 20 हजार लोकांपैकी सुमारे 7700 पुरुष आणि 11500 महिलांना विरुद्ध लिंगाशी संबंध ठेवण्यात स्वारस्य नव्हतं. सुमारे 10 वर्षे चाललेल्या फॉलो-अप अभ्यासादरम्यान, 503 लोक मरण पावले. त्यामध्ये 356 पुरुष आणि 147 महिला होत्या.
अशाच एका अभ्यासात असं लक्षात आलं की, आठवड्यातून किमान एकदा लैंगिक संबंध ठेवणाऱ्या स्त्रियांपेक्षा फारच कमी संबंध ठेवणाऱ्या महिलांना मृत्युचा धोका 70 टक्के जास्त असतो. संशोधकांच्या मते, नियमित सेक्समुळे हृदय व कार्डिओव्हॅस्क्युलर हेल्थ चांगली राहते. सेक्स दरम्यान रिलीज होणारे प्रोलॅक्टिन, एंडॉर्फिन आणि ऑक्सिटोसिन यांसारखे हॉर्मोन्स शरीरासाठी खूप फायदेशीर असतात.