आईचं लफड बेतलं पोराच्या जीवावर; अवघ्या ४ वर्षांच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू
आईच्या प्रियकराने केलेल्या मारहाणीत अवघ्या चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. नाशिकमध्ये घडलेला हा प्रकार पुण्यातील बिबवेवाडी पोलिसांनी उघडकीस आणत मुलाच्या आईला व प्रियकराला ताब्यात घेतले आहे.
पुणे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तो नाशिक पोलिसांकडे वर्ग केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पल्लवी आणि महेश कुंभार मुळचे लातूर जिल्ह्यातील आहेत. पण, पल्लवी लग्नानंतर पुण्यातील बिबवेवाडीत पतीसोबत राहत होती. त्यांना दोन मुली व एक मुलगा होता. तिचे पतीसोबत पटत नव्हते. दरम्यान, पुण्यात तिची व महेश यांची ओळख झाली. ओळखीनंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. प्रेमप्रकरणातूनच पल्लवी तीनही मुलांना घेऊन महेश याच्यासोबत तीन महिन्यांपुर्वीच नाशिक शहरात गेली. पंचवटी भागात ती राहत होती.
पंचवटी भागात ते मोलमजूरीकरून राहत होते. वेदांश आजारी होता. घटनेच्या दिवशी त्याने जेवण केले आणि जेवणानंतर त्याला उलटी झाली. त्याला उलटी झाल्याने महेशला राग आला. त्याने हाताने व झाडूने वेदांशला बेदम मारहाण केली. या मारहाणीत वेदांश बेशुद्ध पडला. तेव्हा त्याला घेऊन दोघेही तेथील रुग्णालयात गेले. परंतु, त्याठिकाणी ऑक्सिजनची व्यवस्था नसल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात नेण्यास सांगितले. मात्र, त्यांनी वेदांशला तेथील रुग्णालयात नेले नाही.
वेदांश विरभ्रद काळे (वय ४, नाशिक) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्रियकर महेश कुंभार (वय २५, सध्या. नाशिक, पंचवटी, मुळ. लातूर) तसेच आई पल्लवी विरभ्रद काळे (वय २५, लातूर, नाशिक) यांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक मंगल मोडवे, पोलीस निरीक्षक मनोजकुमार लोंढे, सहाय्यक निरीक्षक शशांक जाधव, उपनिरीक्षक अशोक येवले. पोलीस अंमलदार विजय लाड, अंकुश केंगले. नितीन धोतरे. महिला पोलीस अंमलदार आदिती बहिरट यांनी केली आहे.
अशी आली घटना उघडकीस…
पल्लवी व महेश यांनी रुग्णालयात वेदांशला नेले, तेव्हा तो मयत झाला होता. बिबवेवाडी पोलिसांकडे खबर गेल्यानंतर येथे बिबवेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांकडे विचारपूस केल्यानंतर संशय बळावला. त्या मुलाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यात जखमा आढळून आल्या. तसेच पल्लवीच्या माहितीत तफावत आढळत होती. त्यामुळे पोलिसांनी सखोल तपास सुरू केला. परंतु, तेव्हाच महेश पळून गेला. पल्लवीला पोलिसी खाक्या दाखवताच तिने घडलेली घटना सांगितली. त्यानंतर तिला अटक केली व गुन्हा नोंद करून तो गुन्हा नाशिक पोलिसांकडे वर्ग केला.
७ वर्षाच्या बहिणीने सांगितली भावासोबत घडलेली घटना
वेदांशला महेशने मारहाण केली तेव्हा त्याची ७ वर्षांची बहिण देखील समोर होती. बिबवेवाडी पोलिसांनी ७ वर्षाच्या बहिणीकडे विचारले, तेव्हा तिने वेदांशला मारहाण केल्यापासून रुग्णालय तसेच तेथून पुण्यात आलेली सर्व घटनाच पोलिसांना सांगितली. तेव्हा पोलिसांचे डोळेही पाणावले.