सोन्याच्या भिंतींचा महाल, त्यात 700 खोल्या अन् ताफ्यात 7 हजार गाड्या; ब्रुनेईचा सुल्तान जगतोय अफलातून लग्झरी लाईफ !
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) ब्रुनेई (Brunei) दौऱ्यावर रवाना झाले आहेत. भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच ब्रुनेई दौरा आहे. ब्रुनेईचे 29 वे सुल्तान हसनल बोलकिया यांनी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रण पाठवलं आहे.
भारताच्या अॅक्ट ईस्ट पॉलिसीच्या दृष्टीकोनातून ब्रुनेई हा अत्यंत महत्त्वाचा देश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आशियाई देश ब्रुनेई आणि सिंगापूरला रवाना झाले आहेत. पीएम मोदींच्या ब्रुनेई दौऱ्यामुळे राजेशाही आणि कट्टरतावादी नियमांसाठी ओळखल्या जाणाऱ्या ब्रुनेईबद्दल भारतात चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. ज्या-ज्या वेळी ब्रुनेईची चर्चा होते, त्या-त्या वेळी ब्रुनेईच्या सुल्तानच्या चर्चा रंगतात. त्याचं राहनीमान, त्याचा महाल, त्याच्या गाडी एकंदरीत सुल्तानचा राजेशाही थाट डोळे विस्फारणारा आहे. ब्रुनेईचा सुल्तान ज्या पद्धतीनं आपलं आयुष्य जगतोय, ते खरंच आश्चर्यचकीत करणारं आहे. त्याच्या महालाच्या भिंती सोन्याच्या आहेत, एवढंच काय तर, त्याच्या गाड्यांच्या ताफ्यात जगभरातील एकापेक्षा एक अशा लग्झरी गाड्या आहेत.
ब्रुनेईचा सुल्तान, हसनल बोल्किया
पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रुनेईच्या दौऱ्यावर आहेत. अशातच ब्रुनेई आणि तिथल्या सुल्तानच्या चर्चांनी जोर धरला आहे. ब्रुनेईच्या सुल्तानचं नाव हसनल बोल्किया आहे. सुल्तान हसनल बोल्कियाचा समावेश जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत होतो. ब्रुनेई 1984 मध्ये ब्रिटन स्वतंत्र झाला. सुल्तान उमर अली सैफुद्दीन III 5 ऑक्टोबर 1967 रोजी ब्रुनेईचे राजा बनले होते. सध्या तेथील सुल्तान हसनल बोल्किया असून जवळपास 59 वर्षांपासून ते ब्रुनेईची राजगादी सांभाळत आहेत.
जगातील सर्व सुखं ज्याच्या पायाशी लोळण घेतात, असा ब्रुनेईचा सुल्तान
हसनल बोलकिया हे आपल्या लग्झरी लाईफसाठी जगभर प्रसिद्ध आहेत. त्याच्या लग्झरी लाईफमधील सर्वात खास बाब म्हणजे, त्याचा महाल. सुल्तानचा सोन्याचा राजेशाही महाल कित्येक एकरांवर पसरला आहे. या महालात सोन्याच्या अनेक गोष्टी आहेत. याशिवाय त्याच्याकडे एक खासगी विमान आहे, आता तुम्ही म्हणाल की, स्वतःचं विमान असण्यात एवढं काय मोठं… पण तुम्ही हे विसरताय की, सोन्याच्या महालात राहणाऱ्या सुल्तानाचं ते विमान आहे. हे विमानदेखील सोन्यानं मढवलेलं आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुल्तानाच्या संपत्तीबाबत अनेक समज-गैरसमज आहेत. सुल्तानाकडे 30 अब्ज रिपोर्ट्सची संपत्ती असल्याचं सांगितलं जात आहे.
सुल्तानच्या सोन्याच्या राजवाड्याची जगभरात चर्चा
एखाद्या परीकथेप्रमाणे राजवाडा सोन्याचा असल्याचं सांगितलं जातं. अरब न्यूजवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, 1980 च्या दशकात सुलतान हसन अलीनं जगातील सर्वात मोठा राजवाडा बांधला, ज्यामध्ये सध्याचा ब्रुनेईचा सुल्तान राहतो. या पॅलेसमध्ये 1,770 खोल्या आणि हॉल आहेत. जगातील सर्वात मोठं लक्झरी कार गॅरेज देखील या पॅलेसमध्ये आहे. हा राजवाडा इतका आलिशान आहे की, इथे चक्क सोन्याच्या भिंती आहेत. हा महाल 2 दशलक्ष स्क्वेअर फूटमध्ये मोठ्या दिमाखात उभा आहे. या राजवाड्याचा घुमट 22 कॅरेट सोन्यानं सजवण्यात आला आहे. या राजवाड्याची किंमत 2550 कोटींहून अधिक आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ब्रुनेईच्या सुल्तानचं सोन्यावर प्रचंड प्रेम आहे. त्याच्या महालाच्या भिंती सोन्याच्या आहेत. एवढंच काय तर महालाच्या आवारात ज्या झाडांच्या कुंड्या आहेत, त्यादेखील सोन्याच्या आहेत. सुल्तानच्या गाड्या, विमान, हेलिकॉप्टर सगळं सगळं सोन्यानं मढवलेलं आहे. सुल्तानचं खाजगी विमानदेखील सोन्यानं मढवण्यात आलेलं आहे. त्यामुळे सुल्तानाच्या विमानाला प्लाईंग पॅलेसदेखील म्हटलं जातं. एवढंच काय तर, मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुल्तानानं आपल्या मुलीला भेट म्हणून Airbus A340 दिलं होतं. यावरुन तुम्ही सुल्तानाच्या आलिशान थाटाचा अंदाज नक्कीच बांधू शकता.