देश-विदेश

भारतात कोरोनाची आणखी एक लाट येणार, शास्त्रज्ञांनी व्यक्त केली चिंता


कोरोनाने संपूर्ण जगात हाहाकार माजवला होता. लाखो लोकांना या जीवघेण्या आजाराची लागण झाली होती, तर हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. अशातच आता अमेरिका आणि दक्षिण कोरियासह अनेक देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.



 

अशातच आता शास्त्रज्ञांनी भारताने कोविडच्या दुसऱ्या लाटेसाठी तयार रहायला हवे असं म्हटलं आहे. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाची चिंता वाढली आहे.

भारतात कोरोनाचे 908 नवीन रुग्ण आढळले

जून ते जुलै 2024 दरम्यान भारतात कोरोनाचे 908 नवीन रुग्ण आढळले आहेत अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. यातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शिव नाडर युनिव्हर्सिटी, नोएडाचे व्हायरोलॉजिस्ट प्रोफेसर दीपक सहगल यांनी कोरोनाबाबत बोलताना म्हटले की, हा विषाणू नक्कीच पुन्हा एकदा पसरायला सुरुवात झाली आहे. कोरोनाचा हा उद्रेक KP व्हेरियंटमुळे झाला आहे, हा Omicron शी संबंधित आहे.

भारतात कोरोनाचे 279 रुग्ण सक्रिय

जगातील अनेक देशांमधील रुग्णसंख्येत वाढ होत आहे. भारतातील अनेक राज्यांमध्येही कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. भारतात कोरोनाचे 279 सक्रिय रुग्ण आहेत. भारतातील परिस्थिती गंभीर नसली तरी आगामी काळात आपल्याला पूर्णपणे तयार राहावे लागणार आहे. कारण यापूर्वी कोरोनाच्या दोन लाटांमध्ये भारतात हजारो लोकांचा मृत्यू झाला होता.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार भारतातील अनेक राज्यांमध्ये कोविडची प्रकरणे वाढत आहेत. आसाम, नवी दिल्ली, गुजरात, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये संसर्ग वाढताना दिसत आहे. JN.1 Omicron व्हेरियंटमधून विकसित झालेले KP.1 आणि KP.2 स्ट्रेन कोविड प्रकरणांमध्ये वाढ होण्यास जबाबदार आहेत अशी माहिती ICMR ने दिली आहे.

दरम्यान, आतापर्यंत रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही. आगामी काळात जर रुग्णसंख्या वाढली तर मात्र आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने सतर्क राहण्याची गरज असल्याची माहितीही शास्त्रज्ञांनी दिली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button