हजारोंचा मृत्यू; शेकडो जणांचे डोळे गेले, बांगलादेश हिंसाचाराचा भयावह रिपोर्ट
बांगलादेशमध्ये गेल्या काही महिन्यांत घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर प्रचंड अस्थिरता आहे. आरक्षण आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक प्रदर्शनात शेकडो नागरिक मारले गेले, अनेकांची घरं पेटवली गेली.
शेख हसीना यांच्या सरकारविरोधातल्या आंदोलनात बांगलादेश होरपळून निघाला. देशात सत्तापालट झाला. या घटनेत किती लोकांचे जीव गेले, याची माहिती देणारा एक रिपोर्ट आला आहे.
400 हून अधिक जणांची दृष्टी गेली
मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालच्या अंतरिम सरकारने बांगलादेशातल्या हिंसक निदर्शनांबाबत आपला रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. या रिपोर्टनुसार, विरोध प्रदर्शनांमध्ये 1000हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सरकारच्या आरोग्य सल्लागार नूरजहाँ बेगम यांनी ही माहिती दिली. नूरजहाँ यांनी ढाक्यातल्या राजारबागच्या केंद्रीय पोलीस हॉस्पिटलला भेट दिली, तेव्हा ही माहिती दिली. पोलिसांच्या कारवाईत 400 हून अधिक जणांची दृष्टी गेली, असंही त्यांनी सांगितलं. यामध्ये विद्यार्थी आणि नागरिकांचा समावेश आहे. काहींच्या एका डोळ्याची तर काहींची दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली आहे.
डोक्यावर व पायावर जखमा
नूरजहाँ यांनी बीडी न्यूज24 डॉट कॉम न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. रुग्णालयाला भेट देऊन नूरजहाँ बेगम यांनी जखमी पोलीस कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि विचारपूस केली. अनेक अधिकाऱ्यांच्या डोक्याला आणि पायाला जखमा झाल्या आहेत. अंतरिम सरकारने प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी घेतली आहे, असंही बेगम म्हणाल्या. जखमींवर मोफत उपचार करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे.
नूरजहाँ म्हणाल्या, काहींच्या पायाला गंभीर दुखापती झाल्या आहेत. अनेकांचे पाय कापावे लागले. त्यांच्यावर उपचार चालू आहेत. आम्ही दात्यांना परदेशातून डॉक्टरांचे पथक आणण्याची विनंती करत आहोत. आम्ही अनेक संस्था आणि जागतिक बँकेशी बोलत आहोत. नोकऱ्यांमधल्या वादग्रस्त आरक्षणाच्या विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. हे आंदोलन भडकलं आणि आंदोलक व सुरक्षा दलांमध्ये हिंसक संघर्ष झाला. नंतर ते सरकारविरोधी अभियान बनलं. यामुळे पंतप्रधान शेख हसीना यांना 5 ऑगस्ट रोजी राजीनामा देऊन देश सोडावा लागला. त्यांनी भारतात आश्रय घेतला. सध्या 84 वर्षीय नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार कार्यरत आहे.