व्हिडिओ न्युज

मुलींच्या वसतिगृहात सापडले छुपे कॅमेरे, लॅपटॉपमध्ये 300 हून अधिक व्हिडिओ


आंध्र प्रदेशातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना उघडकीस येताच संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहात गुप्त कॅमेरे सापडले आहेत.



पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कॅमेऱ्यांमधून रेकॉर्ड केलेले व्हिडिओ हे बॉईज हॉस्टेलमध्ये शेअर करण्यात आले आहेत. 300 हून अधिक व्हिडिओ छुपे कॅमेऱ्यांमधून शूट करण्यात आल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलांसोबतही शेअर करण्यात आला आहे. मुलींच्या वसतिगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीने छुपा कॅमेरा पाहिल्यानंतर वसतिगृह प्रशासनाला याची माहिती मिळाली. वसतिगृहाच्या वॉर्डनला याबाबत माहिती दिली. हे प्रकरण कृष्णा जिल्ह्यातील गुडलावल्लेरू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मुलींच्या वसतिगृहाशी संबंधित आहे. छुपा कॅमेरा सापडल्याची बातमी संपूर्ण कॉलेजमध्ये वाऱ्यासारखी पसरली. यानंतर वसतिगृहातील संतप्त विद्यार्थिनी बाहेर आल्या आणि आंदोलन सुरू झाले. साहजिकच या घटनेबद्दल मुलींमध्ये प्रचंड संताप आहे. कारण ही बाब थेट त्यांच्या सुरक्षिततेशी आणि सन्मानाशी संबंधित आहे.

 

वसतिगृहातून बाहेर पडताना मुलींनी ‘वुई वॉन्ट जस्टिस’च्या नारे लावायला सुरुवात केली. विद्यार्थिनींनी गोपनीयतेचा भंग करणाऱ्या आणि व्हिडिओ फुटेज शेअर करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केलीये. विद्यार्थिनीचे निदर्शन पाहून महाविद्यालय प्रशासन आणि पोलिसांनी तत्परतेने कारवाई केली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास केला असता अनेक मोठे खुलासे झाले. तपासासाठी बॉईज हॉस्टेलमध्ये पोहोचलेल्या पोलिसांनी इंजिनीअरिंगच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. मात्र तपासात ठोस निकाल येईपर्यंत ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्याची ओळख सार्वजनिक केली जाणार नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 

मुलींच्या वसतिगृहाच्या बाथरुममध्ये किती कॅमेरे लावण्यात आले होते आणि वसतिगृहाच्या इतर भागातूनही असे कॅमेरे जप्त करण्यात आले आहेत का, याचा खुलासा पोलिसांनी केलेला नाही. मात्र या प्रकरणाला गती मिळाल्याने कॉलेज प्रशासनाची जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांना पूर्ण सहकार्य करत असल्याचे कॉलेजशी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

लॅपटॉपमधून 300 व्हिडिओ सापडले

विजय असे आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे, विजय हा या महाविद्यालयाचा विद्यार्थी असून त्याच्या लॅपटॉपमधून सुमारे 300 अश्लील व्हिडिओ जप्त करण्यात आले आहेत. विजयने पैशांसाठी हे व्हिडिओ इतर विद्यार्थ्यांना विकल्याचाही संशय पोलिसांना आहे. मात्र, विजयच्या अटकेबाबतची परिस्थिती सध्या स्पष्ट झालेली नाही. या प्रकरणात पोलिसांचा तपास अजूनही सुरू आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

कॅमेरे सापडल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश खुद्द मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दिले आहेत. त्यानंतर पोलिसांचा तपास आणि कारवाई आणखी वाढलीये. कृष्णा जिल्ह्याचे डीएम डीके बालाजी आणि पोलिस अधीक्षक गंगाधर राव घटनास्थळी पोहोचले. या प्रकारची ही पहिलीच घटना नसली तरी याआधी कर्नाटकातील बेंगळुरू येथील थर्ड वेव्ह कॅफेच्या वॉशरूममध्येही कॅमेरा सापडला होता. आरोपींनी स्मार्टफोन कॅमेरा वॉशरूममध्ये लपवून ठेवला होता. तपास केला असता हा कॅमेरा तेथील एका कर्मचाऱ्याने बसवला असल्याचे आढळून आले. अशा घटनांना आळा घालण्यासाठी शासन आणि महाविद्यालय प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी सध्या मुलींकडून होत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button