बीड : आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 8 ऑगस्टपासून जनसन्मान यात्रेला सुरुवात केली आहे. या यात्रेच्या निमित्ताने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार राज्याचा दौरा करत आहेत.
आज अजित पवारांची यात्रा बीड जिल्ह्यात आहे. गेल्या 8-9 दिवसांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार दुसऱ्यांदा बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
घरगुती वापराचे गॅस सिलिंडर दिवसेंदिवस महाग होत चालेले आहेत. त्यात गृहिणींना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अजित पवार यांनी अर्थसंकल्पात घोषीत केली होती. या योजनेंतर्गत 52 लाख 16 हजार 412 कुटुंबांना या योजनेचा फायदा होणार आहे. या घोषणेचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केला. लाडक्या बहिणींना दर महिना 1500 रुपयांसोबतच तीन गॅस सिलिंडरचे पैसे त्यांच्या खात्यात जमा करणारी ही योजना आहे, असे अजित पवार म्हणाले.
जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने बीड शहर गुलाबी झाले आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत बीड शहरातून यात्रा निघाली. यावेळी क्रेन लावून फुलांचे मोठमोठ्या फुल हारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चौकाचौकात स्वागत करण्यात आले. यात्रेमध्ये मोठ्या संख्येने महिला बाईकस्वार आहेत. त्यांच्या हातामध्ये गुलाबी रंगाचे झेंडे देखील आहेत. चौकाचौकात लावण्यात आलेल्या स्वागत कमानी देखील गुलाबी आहेत. यात्रे दरम्यान अजित पवार यांनी बीडमधील एका उडपी हॉटेलमध्ये नाश्ता केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यातील महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपये दिले जात आहेत. योजनेतील पात्र महिलांना दोन महिन्यांचे 3000 हजार रुपये रक्षा बंधनापासून दिले जात आहेत. थेट महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होत आहेत. या योजनेचा आगामी विधानसभा निवडणुकीत लाभ होण्याची आशा महायुतीतील घटक पक्षांना आहे. योजनेची घोषणा अर्थसंकल्पात अजित पवारांनी केली. त्यामुळे आपल्याही पक्षाला योजनेचा लाभ झाला पाहिजे, यासाठी अजित पवार गुलाबी जॅकेट, गुलाबी बॅनर आणि गुलाबी झेंडे झळकावत राज्यात जनसन्मान यात्रेला निघाले आहेत. आज ही यात्रा बीड जिल्ह्यात आहे.