‘शिवरायांचा यापेक्षीही भव्य पुतळा तिथेच उभारू’ – देवेंद्र फडणवीस
मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेबाबत राज्यातील शिवप्रेमी संघटनांसह जनतेमध्ये संतापाचं वातावरण आहे. मालवणमध्ये बुधवारी महाविकासआघाडीकडून आंदोलन केलं जाणार आहे.
या आंदोलनामध्ये आदित्य ठाकरेही सहभागी होणार आहेत. शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सलटंट चेतन पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवरायांचा पुतळा कोसळणं ही दु:खद घटना असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. या प्रकरणी राजकारण करणं चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलंय. हा पुतळा नौदलानं तयार केला होता, इतक्या वेगाने वारा येऊ शकतो, याचं आकलन पुतळा बनवणाऱ्यांनी केलं नाही, असंही फडणवीस यांनी म्हटलंय. याच ठिकाणी शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारणार असल्याची घोषणा फडणवीसांनी केली आहे.
‘छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ कोसळणं हे अत्यंत दु:खदच आहे, त्याबद्दल आपल्या सगळ्यांना दु:ख आहे. पण त्यावर राजकारण करणं त्यापेक्षा दु:खद आहे. हा पुतळा राज्य सरकारने तयार केलेला नाही, तो भारतीय नौदलाने तयार केलेला पुतळा आहे. त्यांनी ज्याला काम दिलं त्याला इतक्या वेगाने हवा येऊ शकते, वारा येऊ शकतो, याचं आकलन केलं नाही. जे लोखंड वापरलं जातं ते लवकर गंजू शकतं, याचंही योग्य आकलन कदाचित त्यांनी केलं नाही’, असं फडणवीस म्हणाले आहेत.
‘आम्ही संकल्प केला आहे, त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा त्याहीपेक्षा भव्य आणि हजार वर्ष टिकेल असा पुतळा आम्हाला तयार करायचा आहे’, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.