लोकशाही विश्लेषण

Vishalgad Fort : विशाळगडाचा इतिहास काय सांगतो.?


 

Vishalgad Fort : विशाळगडावरचे अतिक्रमण आणि त्यावरून झालेला हिंसाचाराचे प्रकरण सध्या राज्यात भलतेच तापले आहे. विशाळगड अतिक्रमण हटवावे या मागणीसाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले.

 

यावेळी हिंसक वळण लागून विशाळगडच्या पायथ्याला असलेले दुकाने, घरे, प्रार्थनास्थळ यांची तोडफोड करण्यात आली. नागरिक, पोलीस अधिकारी यांच्यावर दगडफेक, धक्काबुक्की प्रकार घडले.

किल्ले विशाळगड येथे अतिक्रमणे वाढली आहेत. ती हटवण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी काही दिवसांपूर्वी महाआरती केली होती. तर या आठवड्यात माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी गेली दीड वर्ष शासन, प्रशासन याबाबत निष्क्रिय असल्याचा आरोप करून आज विशाळगड येथे येण्याचे आवाहन शिवप्रेमींना केले होते.

ते स्वतः मोहिमेमध्ये सहभागी झाले होते. मुसळधार पाऊस असतानाही रात्रीपासूनच वेगवेगळ्या मार्गांनी शिवप्रेमी गडावर दाखल झाले होते. त्यानंतर गडावरील रहमान मलिक दर्ग्याजवळ जय श्रीरामाच्या घोषणा देत दगडफेकीचा प्रकार घडला. याचे पडसाद गडाच्या पायथ्याला उमटले.

या ठिकाणी जमलेले हजारो लोक आक्रमक झाले. संभाजीराजे छत्रपती यांचे गडाच्या पायथ्याशी आगमन झाल्यावर जय भवानी जय शिवाजी, विशाळगड अतिक्रमण मुक्त करा अशा घोषणा देण्यात आल्या. त्यांना गडावर जाण्यास प्रतिबंध करण्यात आला. त्यावर जमाव प्रक्षुब्ध झाला.

हिंसक जमावाने भर पावसात एका घरात सिलेंडरचा स्फोट केला. कित्येक घरे पेटवून देण्यात आली. शेकडो दुचाकी, मोटारी यांची नासधूस करण्यात आली.

या सगळ्या घटनेमध्ये विशाळगडावर असलेल्या एका दर्ग्याचा उल्लेख वारंवार येत आहे. सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेल्या विशाळगडावर एक दर्गा आहे. हा दर्गा हजरत पीर मलिक रेहान यांचा आहे. दुसरा राजा भोज याने आपली राजधानी इ.स. 1190 च्या सुमारास कोल्हापूरहून पन्हाळ्यावर हलविली. त्यानंतर त्याने घाटमार्गाचे रक्षण करण्यासाठी अनेक किल्ले बांधले.

त्यापैकी एक किल्ला होता, किशागिला. (किशीगीला – भोजगड – खिलगिला – खेळणा उर्फ विशाळगड). नंतर हा किल्ला यादवांच्या हाती गेला. यादवांचा अस्त झाल्यावर दक्षिणेत बहामनींची सत्ता उदयाला आली. इ.स. 1453 मध्ये बहामनी सेनापती मलिक उतुजार किल्ले घेण्यासाठी कोकणात उतरला.

त्याने शिर्क्यांचा प्रचितगड ताब्यात घेतला व शिर्क्यांना धर्मांतराची अट घातली. पण शिर्क्यांनी मलिक उतुजारला उलट अट घातली की, प्रथम माझा शत्रु व खेळणा किल्ल्याचा शंकरराव मोरे याला प्रथम मुसलमान करा, नंतरच मी मुसलमान होऊन सुलतानाची चाकरी करीन. एवढेच सांगून शिर्के थांबले नाहीत, तर त्यांनी खेळणा किल्ल्यापर्यंतची वाट दाखवण्याचे वचन दिले.

या अमिषाला भुललेल्या मलिकने शिर्क्यांच्या सल्ल्याप्रमाणे जाण्याचे ठरविल्यावर प्रारंभीच काही दक्षिणी व हबशी सैनिकांनी पहाडात/जंगलात शिरण्याचे नाकारले. उरलेल्या फौजेला घेऊन मलिक सह्याद्रीच्या अंतरंगात शिरला. वचन दिल्याप्रमाणे शिर्क्यांनी पहिले दोन दिवस रुंद व चांगल्या वाटेने सैन्याला नेले. तिसर्या दिवशी मात्र शिर्क्यांनी त्यांना घनदाट अरण्यात नेले.

मैदानी मुलुखात आयुष्य गेलेल्या मुसलमान सैनिकांची सह्याद्रीच्या वाटांनी दमछाक केली. या लोळागोळा घालेल्या सैन्याला शिर्क्यांनी अशा ठिकाणी आणले की, जेथे तिनही बाजूंनी उत्तुंग डोंगर व चौथ्या बाजूस खाडी होती. तेथून पुढे जाण्यास मार्ग नव्हता व परत फिरण्यासाठी पुन्हा ती खडतर परतीची वाट कापण्याचे सैन्यात त्राण नव्हते.

त्यातच मलिक उतुजार आजारी पडून त्यास रक्ताची हगवण लागली. त्यामुळे त्याला सैन्याला हुकूमही देता येईना. अशा परिस्थितीत सैन्य दमून भागून झोपले असतांना शिर्क्यांनी खेळण्याच्या मोर्यांशी संधान बांधले व मलिकच्या सैन्यावर अचानक छापा घातला. त्यावेळी झालेल्या कत्तलीत मलिक उत्तुजारसह सर्व लोक मारले गेले.

पुढे 1469 साली बहामनी सुलतानाने बब्कीरे त्याचा सेनापती मलिक रेहान याला खेळणा किल्ला घेण्यासाठी पाठविले. सहावेळा प्रयत्न करुनही त्याला हा किल्ला घेता आला नाही. सातव्या प्रयत्नात 9 महिन्याच्या निकराच्या प्रयत्नाने त्याला हा किल्ला घेता आला. या मलिक रेहानच्या नावाचा दर्गा या किल्ल्यावर आहे. त्यातील फारशी शिलालेखात वरील उल्लेख आढळतो.

यानंतर जवळजवळ पावणेदोनशे वर्ष हा किल्ला बहामनी आदिलशाही या मुस्लीम सत्तांकडे होता. 28 नोव्हेंबर 1659 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळा घेतला. त्याच वेळेस खेळणा किल्ला जिंकून घेतला व त्याचे नाव ‘विशाळगड’ ठेवले. 3 मार्च 1660 ला सिद्दी जौहारने पन्हाळ्याला वेढा घातला. त्याचवेळी जसवंतराव दळवी व शृंगारपूरचे सूर्यराव सूर्वे विशाळगडाला वेढा घालून बसले होते.

पन्हाळ्याच्या वेढ्यातून बाहेर पडून विशाळगडाकडे जाताना महाराजांनी हा वेढा फोडून काढला व महाराज विशाळगडावर सुखरुप पोहोचले. त्याआधी पावनखिंडीत 300 निवडक मावळ्यांसह बाजीप्रभूनीं सिद्दीचे सैन्य रोखून धरले व आपल्या प्राणांची आहूती दिली. शिवरायांनी विशाळगडाच्या मजबूतीकरीता 5000 होन खर्च केल्याचा उल्लेख आहे.

संभाजी महाराजांनी विशाळगडावर अनेक नविन बांधकामे केली. 1686 मध्ये शिर्क्यांचे बंड मोडून काढण्यासाठी संभाजी महाराजांनी कविकलशांना पाठविले, परंतू पराभूत होऊन त्याने विशाळगडाचा आसरा घेतला. इ.स. 1689 मध्ये संभाजी महाराज विशाळगडावरुन रायगडाकडे जातांना संगमेश्वर येथे तुळापूरी पकडले गेले व त्याची निर्घृण हत्या करण्यात आली.

त्यानंतर राजाराम महाराजांच्या काळात विशाळगड मराठ्यांच्या हालचालींचे प्रमुख केंद्र होता. रामचंद्रपंत आमात्यांनी विशाळगडास आपले मुख्य ठिकाण केल्यामुळे त्यास राजधानीचा दर्जा प्राप्त झाला. 1701 साली राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या तृतीय पत्नी अंबिकाबाई विशाळगडावर सती गेल्या.

 

डिसेंबर 1701 मध्ये औरंगजेब स्वत: मोठ्या फौजेनिशी विशाळगड घेण्यासाठी आला. पण विशाळगडाचे किल्लेदार परशूराम पंतप्रतिनिधी यांनी तब्बल सहा महिने किल्ला लढवून, 6 जून 1702 रोजी अभयदान व स्वराज्य कार्यासाठी 2 लाख रुपये घेऊन किल्ल्याचा ताबा औरंगजेबाला दिला. त्याने विशाळगडाचे नाव बदलून ‘सरवरलना’ असे ठेवले.

विशाळगड जिंकून पन्हाळ्याला परत जातांना औरंगजेबाच्या सैन्याला सह्याद्रीने झूंजवले. तब्बल 37 दिवसांनी पन्हाळ्याला पोहोचेपर्यंत मुघल सैन्याचे अपरिमित हाल व नुकसान झाले. त्याची वर्णने मुघल इतिहासकारांनी लिहिलेली आहेत. इ.स. 1707 मध्ये ताराराणीने विशाळगड पुन्हा जिंकून घेतला. पुढे विशाळगड करवीरकरांच्या ताब्यात गेला. त्यांनी तो पंतप्रतिनीधींना दिला. 1844 साली इंग्रजांनी विशाळगड जिंकून त्यावरील बांधकामे पाडून टाकली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button