Manoj Jarange Patil : सरकारच्या बाजूने जावून सुपाऱ्या घेवुन समाजच नुकसान करू नका, समाज माफ करणार नाही
Beed News : Manoj Jarange Patil -“मराठा समाजातील काही समन्वयक आणि अभ्यासकांचं दुकान बंद पाडल्याने ते माझ्यावर जळत आहेत. मात्र, सरकारच्या बाजूने जावून सुपाऱ्या घेवुन समाजच नुकसान करू नका, समाज माफ करणार नाही, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
जरांगे पाटील यांची आज बीडमध्ये शांतता रॅली पार पडली आहे. लातूर, धाराशिवनंतर बीडमध्ये या रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. लाखोंच्या संख्येने मराठे या बीडमधील शांतंता रॅलीमध्ये सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. सगे सोयऱ्यांनाही मराठा आरक्षण लागू करण्याचा अध्यादेश जारी करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 13 जुलैचा अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे 13 तारखेला नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
मराठा समाजाची चेष्टा कधीपर्यंत करणार? ठरलेल्या चार शब्दांप्रमाणे आरक्षण द्या. मराठा आणि कुणबी एकच आहे. हैद्राबादमध्ये नोंदी सापडल्या, अगोदर का नाही? मराठ्याचा लढा तुम्ही व्यवस्थित लढला असता तर मला लढायची गरज लागली नसते. मराठा समन्वयक आणि अभ्यासक यांचे दुकान बंद पाडले म्हणुन त्यांना खुपत आहेत. काही अभ्यासक, समन्वयक सोबत आहेत. सरकार यांना पुढे करुन डाव टाकत आहेत. सरकारच्या बाजूने जावून सुपाऱ्या घेवुन समाजच नुकसान करू नका, मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण दिल्याशिवाय मी इंचभर मागे सरकत नाही, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
भुजबळ यांच्यावर सडकून टीका
जातीय दंगली घडवल्या पाहिजेत हे सरकारचं स्वप्न आहे. छगन भुजबळ यांना सरकारने पेरलंय. छगन भुजबळ यांच्या दहा पिढ्या आल्या तरी ओबीसीमधूनच आरक्षण घेणार आहे. निवडणुकीत हारजीत होत असते. माझ्या मराठ्याला तुम्ही जातीवादी ठरवलं. बीड जिल्ह्याने महारष्ट्राला परिवर्तनाचा आदर्श दिला. माझ्या मराठा समाजाला डाग लावता. हो खरंच मराठ्यांनी पाडलं. निवडणूक झाल्यावर माझ्या गोरगरीब मराठ्याला मारलं. स्वतः ला पुरोगामी मानता माझी आई बहीण तुमची आई बहीण वाटत नाही का? छगन भुजबळ यांनी माझ्या आंदोलनासमोर आंदोलन उभं केलं. याला जातीवाद म्हणत नाही का? असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळ यांच्या सकडून टीका केली.