शांतता रॅलीआधी अशोक चव्हाणांनी घेतली मनोज जरांगेंची भेट,शांतता रॅलीला सुरुवात
Manoj Jarange : मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आजपासून (6 जुलै) शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे. याआधीच शुक्रवारी रात्री उशिरा भाजपचे नेते आणि खासदार अशोक चव्हाण आणि शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली.
यावेळी विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात…
काय म्हणाले अशोक चव्हाण?
खासदार अशोक चव्हाण आणि मनोज जरांगे पाटील या दोघांमध्ये अतरवालीच्या सरपंचाच्या घरी भेट झाली. या भेटीत तब्बल दोन तास विविध विषयांवर चर्चा झाली. यानंतर बोलताना अशोक चव्हाण यांनी म्हटले की, ‘आमचा सर्वांची इच्छा आहे हा विषय जेवढ्या लवकर संपवता येईल तेवढा संपलेला बरा. आजच्या भेटीत राजकीय चर्चेचा विषयच नव्हता. सरकार आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये समन्वयाची आवश्यकता आहे. याबाबत संवाद व्हावा म्हणून मी भेट घेतली.’
भेटीनंतर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया
या भेटीबाबत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, “अशोक चव्हाण हे सरकार, समाज किंवा माध्यम म्हणून आलेत का? हा विषय महत्त्वाचा नाही. त्यांच्या माध्यमातून चर्चा सुरु आहे. ही भेट आणि चर्चा सकारात्मक झाली. सगेसोयरे अंमलबजावणी, गॅझेट बाबत आणि मुलींच्या मोफत शिक्षणाबाबत सविस्तर झाली. आम्ही आमच्या मागण्यांबाबत पाठपुरावा सुरूच राहणार आहे. आज चव्हाण यांच्याशी सगेसोयरेची आमच्या व्याख्येप्रमाणे अंमलबजावणी, हैदराबाद गॅजेट आणि सरसकट गुन्हे मागे घेण्याबाबत आज चर्चा झाली आहे.”
आजपासून शांतता रॅलीला सुरुवात
मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीला आजपासून सुरुवात होत आहे. ही रॅली 13 तारखेपर्यंत चालणार आहे. याबाबत बोलताना जरोंगे पाटलांनी सांगितले की, ’13 जुलैपर्यंत सरकारने सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी केली नाही तर 288 उमेदवार पाडायचे की उभे करायचे याबाबत विचार करावा लागेल. मात्र आम्हाला राजकारणात जाण्याची इच्छा नाही. त्यामुळे 13 तारखेनंतर याबाबत निर्णय घेऊ.’ त्यामुळे आता 13 जुलैनंतर मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.