Beed News : बीड यंदाच्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) बीडमध्ये पंकजा मुंडेंचा (Pankaja Munde) 6 हजार मतांनी पराभव झाला. हा पराभव महायुतीतील घटक पक्षांनी पंकजा मुंडेंविरुद्ध काम केल्यामुळे झाल्याचा आरोप करण्यात आला होता.
याशिवाय मराठा आणि वंजारी अशा जातीय संघर्षामुळे पंकजा मुंडे यांना कमी मत मिळाली, अशीची चर्चा रंगली आहे. मात्र यानंतर बीड जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांची आता पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. याशिवाय दुसऱ्या एका प्रकरणात न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. Beed Politics Kundlik Khande expelled from party in alleged audio clip case and three days police custody by court in another case)
बीडचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिवराज बांगर या दोघांमधील संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये कुंडलिक खांडे म्हणताना दिसत आहेत की, मी बजरंग सोनावणे यांचं काम केलं आहे. त्यांनी आता आपला दिलेला शब्द पाळावा. फक्त माझ्या गावातील 100-200 मतं पंकजा मुंडे यांना जास्त गेली आहेत. कारण ते करणं मला गरजेचं होतं. मला जातीवादी शिक्का नको आहे. ओबीसी मतांचा आपल्याला विधानसभेला फायदाच आहे. बाकी 376 बुथवरची यंत्रणा मी बजरंग सोनावणे यांना देऊन टाकली हेही तितकंच खरं आहे. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पंकजा मुंडेंना धोका दिला आहे. यावर शिवराज बांगर म्हणतात की, नुसती यंत्रणा नाही, तर बजरंग सोनावणे यांच्यासाठी पैसेही दिले का? यावर कुंडलिक खांडे म्हणतात की, नुसती यंत्रणा नाही तर मी लोकांना पैसे देखील दिले आहेत, असा संवाद ऑडिओ क्लिपमधून व्हायरल झाला होता.
याप्रकरणी कुंडलिक खांडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे समर्थकाकडून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कुंडलिक खांडे यांच्यावर टीका होताना यला मिळत आहे. पंकजा मुंडे समर्थकांनी कुंडलिक खांडेंचे ऑफीसही फोडलं आहे. या प्रकरणानंतर कुंडलिक खाडेंचा फोन बंद होता, पण ऑडिओ क्लिपमधून व्हायरल होणारा आवाज त्यांचा नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होते. मात्र यानंतर आता धनंजय मुंडे यांचे सहकारी वाल्मिक कराड यांनी कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी शिवसेना बीड जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांच्याविरुद्ध परळी पोलीस स्टेसनमध्ये तक्रार दाखल केली. यानंतर आज, शनिवारी (29 जून) पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
कुंडलिक खांडेंना तीन दिवसाची पोलीस कोठडी
दरम्यान, कथित ऑडिओ क्लिपचे क्लिपचे प्रकरण चर्चेत असतानाच आज, शनिवारी (29 जून) पहाटे कुंडलिक खांडे यांना स्थानिक गुन्हे शाखेने तीन महिने जुन्या प्रकरणात अटक केली. शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांच्यावर तीन महिन्यापूर्वी प्राणघातक हल्ला झाला होता. या प्रकरणात शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे आरोपी होते. त्यामुळे बीडच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता पक्षातून हकालपट्टी आणि तीन दिवसांची पोलीस कोठडी एकाच दिवशी झाल्यामुळे कुंडलिक खांडे यांना धक्का बसला आहे.