मुस्लिमांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मनोज जरांगेंची मागणी; लक्ष्मण हाके काय म्हणाले…
मुस्लिमांच्या नोंदी कुणबी म्हणून निघत असतील, तर राज्यातील सर्व मुस्लिमांना ओबीसीतून आरक्षण द्यावं, अशी मागणी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीनंतर आता विविध चर्चांना उधाणं आलं आहे.
यासंदर्भात आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.
काय म्हणाले लक्ष्मण हाके?
“हिंदू धर्म हा सामाजिक उतरंडीमध्ये विभागला गेला आहे. पण मुस्लीम समाजाकडे धर्म म्हणून बघितलं जातं. त्यांच्यात जाती नसल्याने त्यांच्यातील कारू आणि नारू, असे दोन गट पडतात, यापैकी कारू हा व्यवसाय करणारा घटक आहे. त्यामुळे त्यांना संविधानानुसार स्थानिक अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र दिलं जातं”, असं लक्ष्मण हाके म्हणाले. “ओबीसींच्या हक्कासाठी शब्बीर अन्सारी यांचं मोठं काम आहे. त्यांनी मुस्लिमांच्या अधिकारासाठी जवळपास १०० अध्यादेश सराकरकडून काढून घेतलं आहेत. यासंदर्भात शब्बीर अन्सारी सफाईदारपणे उत्तर देऊ शकतात”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले होते?
दरम्यान, आज माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांनी मुस्लिमांनाही ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली होती. “सरकारी नोंदी या मारवाडी, ब्राह्मण, लिंगायत आणि मुस्लिमांच्या सुद्धा निघाल्या आहेत. जर त्यांच्या नोदी शेतकरी कुणबी म्हणून निघाल्या असतील, तर मुस्लिमांना सुद्धा ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे. त्यांच्यावर अन्याय होता कामा नये”, असं ते म्हणाले होते.
“आता सरकारने कायद्याने बोलावं, पाशा पटेल यांची सुद्धा कुणबी नोंद निघाली आहे. जर मुस्लिमांच्या नोंदी कुणबी म्हणून निघत असतील, तर राज्यातील सर्व मुस्लिमांना ओबीसीतून आरक्षण द्यावं, आणि सरकार आरक्षण कसं देत नाही, तेच मी बघतो”, असा इशाराही त्यांनी दिला होता.