जरांगेंच्या निर्णयाने OBC-मराठा संघर्ष टळला, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार घेतल्यानंतर जरांगे पाटील यांना डिस्चार्ज देण्यात आला असून आता ते अंतरवाली सराटी ऐवजी थेट बीड चाकरवाडी इथं जाणार आहेत.
साधू संतांचे दर्शन आधी घेणार असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलंय. जरांगे पाटील हे जर थेट अंतरवाली सराटीला गेले असते तर ओबीसी आणि मराठा कार्यकर्ते आमने-सामने येऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता.
पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की, जिथं उपोषण सुरू होतं तिथं जाणार होतो. त्यानंतर पुढच्या दौऱ्याला जाणार होतो. मात्र इथेच वेळ झाला आहे आणि आता अंतरवाली सराटीला जाण्यास उशीर होईल. चाकरवाडीत साधू संतांचे दर्शन घेणार आहे. त्यानंतर पुढे काय करायचं ते ठरवेन. अंतरवालीत जाण्यापासून मला कुणी थांबवलेलं नाही. कुणाला थांबवता येणार नाही. पण मला वेळ झाला असल्याने थेट चाकरवाडी इथं जात आहे.
अंतरवाली फाट्यावर उपोषण सुरु असल्यानं मार्ग बदलला का असं विचारलं असता जरांगे यांनी म्हटलं की, तिथे उपोषण सुरू आहे म्हणून मी मार्ग बदलला असे म्हणणे चुकीचे आहे. मला उशीर झाला म्हणून मला जिथे जायचे तिथे सरळ जाणार आहे. अंतरवालीला जायला काय अडचण आहे. पण मला वेळ झाला म्हणून गेलो नाही.
ओबीसींच्या उपोषण स्थळी सरकारचे शिष्टमंडळ भेटण्यासाठी दाखल झालं आहे. त्यासंदर्भात बोलताना जरांगेंनी म्हटलं की, ओबीसी उपोषणात सरकार भेटायला येत असेल तर त्यांचा प्रश्न आहे. उपोषण म्हणले की सरकार येतातच. सरकार पुरस्कृत ते उपोषण असेल की असेच होते. आमचा जातीय वाद आणि त्यांचे शांततेत अशा गोष्टी असतात असा गंभीर आरोपही जरांगे पाटील यांनी केला.
ओबीसी-मराठा संघर्ष टळला
अंतरवाली सराटीला जाणार असते तर लक्ष्मण हाके यांचे उपोषण सुरू होतं तिथूनच जरांगेंचा ताफा गेला असता. त्यामुळे संघर्षाची स्थिती निर्माण झाली असती. जरांगे यांनी वेळ झाल्यानं अंतरवाली सराटी ऐवजी बीड चाकरवाडीला जाण्याचा निर्णय घेतला आहे. जरांगेंच्या या निर्णयाने ओबीसी-मराठा कार्यकर्ते समोरासमोर येणं सध्या टळलं आहे. आज वडी गोद्री फाट्यावर पोलिसांचा जबरदस्त बंदोबस्त लावण्यात आला आहे. ओबीसी समाजाचे आंदोलन वडी गोद्री अंतरवाली सराटी फाट्यावर सुरू आहे. मराठा आणि ओबीसी समाजचा संघर्ष होण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी आधीच काळजी घेतली आहे. SRPF ची तुकडी आणि दंगल नियंत्रण पथक सुद्धा तैनात केले आहे.