‘आरक्षण दिल्याशिवाय सुट्टी नाही, नाही तर 288 जागा लढवणार’ – मनोज जरांगे पाटील
“सरकारने काय ठरवले माहीत नाही. आम्ही आमचा फोकस क्लिअर केला आहे. देश स्वतंत्र नव्हता, तेव्हापासून मराठ्यांचे आरक्षण आहे. आमचे रेकॉर्डला आहे ते आरक्षण घेणार आहोत. ओबीसी आणि कुणबी एकच आहेत आणि आम्ही ते घेणार आहोत.
तुमच्या पेक्षा 100 वर्ष पूर्वीचे आरक्षण आहे. सग्या-सोयऱ्याचे आरक्षण टिकणार नाही असे महाजन म्हणत असतील तर त्यांचा डाव आहे” असं मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील म्हणाले. ‘आरक्षण दिल्याशिवाय सुट्टी नाही, नाही तर 288 जागा लढवणार’ असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन ही पेंद्या-सुदाम्याची जोडी. व्यवसायावर आरक्षण दिले आहे मग, मराठ्यांना आरक्षण का नाही?. आम्हाला राजकारणात जायचे नाही, पण 13 तारखे पर्यंत आरक्षण दिले नाही तर पुढची भूमिका ठरवू” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“आम्ही हाके यांना विरोधक मानत नाही, त्यांनी त्यांचे आंदोलन करावे. सग्या सोयऱ्याची आम्ही दिलेल्या व्याख्ये प्रमाणे घेतले तर आम्हाला मान्य. प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल आम्ही आदर करतो. म्हणून त्यांना आम्ही पाठिंबा दिला होता. तुम्हाला सग्या सोयऱ्याची व्याख्या ठेवायची असेल तर अ, ब, क, ड करा. आमच्या व्याख्येप्रमाणे सग्या सोयऱ्याची अमलबजावणी केली नाही, तर ते आम्हाला मान्य नाही. त्यांनी पाठवलेल्या चार न्यायमूर्तींना कळत नव्हते असे गिरीश महाजन यांना म्हणायचे आहे का?आरक्षण सरकारला टिकू द्यायचे नाही” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
‘आरक्षण घेतल्याशिवाय मी हटत नाही’
“मराठा आणि कुणबी एक नाही हे माझ्या समोर येऊन सिद्ध करावे. ज्याला घ्यायचे त्याने कुणबी प्रमाणपत्र घ्यावे. मराठा आणि कुणबी एकच आहे आणि त्यामुळे सरसकट द्यावे. मी जिवंत आहे तो पर्यंत मी मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देणारच. देणारे आपण, आपण बनू आणि कायदा करू. 13 तारखेपर्यंत मी सरकारवर विश्वास ठेवणार. फडवणीस यांच्यावर माझा विश्वास. आम्हाला भिडवत ठेवतील तर हे पडतील. मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर 20 वर्ष यांना रुळावर येऊ देणार नाही” असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. “गरज पडल्यास मराठा उभा करणार नाही, पण त्यांना निवडून येऊ देणार नाही. आरक्षण घेतल्याशिवाय मी हटत नाही” असं मनोज जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितलं.