बीड मध्ये भाजपला मतदान न करणाऱ्या मराठ्यांवर हल्ले; मनोज जरांगेंची फडणवीसांकडे कारवाईची मागणी
बीड लोकसभा मतदार संघात भाजप उमेदवाराला मतदान न करणाऱ्या मराठा समाजाच्या मतदारांवर हल्ले करण्याचे प्रकार घडले असून या प्रकरणी संबंधीतांवर त्वरीत कारवाई केली जावी अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरंगे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
अंतरवली सराटी गावात आपल्या बेमुदत उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी पत्रकारांशी बोलताना जरांगे यांनी बीड जिल्ह्यातील काही गावांमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्याकडून पराभूत झालेल्या भाजपच्या पंकजा मुंडे यांना मतदान न केल्याने मराठ्यांवर हल्ले होत असल्याचा दावा केला.
त्यांनी गृहमंत्री आणि बीडच्या पोलीस अधीक्षकांना अशा हिंसाचारावर कारवाई करण्याचे आवाहन करून मराठा तरुणांनी शांतता आणि जातीय सलोखा राखण्याचे आवाहन केले. मराठा हिताला विरोध करणाऱ्या नेत्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.
मराठा समाजातील सगेसोयऱ्यांना कुणबी म्हणून मान्यता दिली जावी,मराठा समाजाला कुणबी म्हणून मान्यता देण्यासाठी कायदा करावा अशी मागणी करीत त्यांनी शनिवारपासून पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केले आहे.