इंद्राच्या सर्वांत सुंदर अप्सरेने अर्जुनाला का दिला नपुंसक होण्याचा शाप?
पांडव 14 वर्षांच्या वनवासात असताना अर्जुनानं अस्त्रं व शस्त्रं मिळवण्यासाठी इंद्राला प्रसन्न करून घेतलं. इंद्राकडे अर्जुन दोन वर्षं राहिला. त्या काळात तिथली एक सुंदर अप्सरा अर्जुनावर मोहित झाली; मात्र कालातराने तिनेच अर्जुनाला नपुंसक होण्याचा शाप दिला.
त्यांच्यामध्ये काय घडलं होतं, ते जाणून घेऊ या.
द्यूतात हरल्यानंतर पांडवांना 13 वर्षांचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास भोगावा लागला. त्या काळात पांडव वनात राहायचे. हस्तिनापुरात परत आल्यावर कौरवांबरोबर युद्ध होणार असल्याची त्यांना कल्पना होती. त्यामुळे वनात असताना पांडवही युद्धाची तयारी करत होते. त्याकरिता इंद्रदेवाला प्रसन्न करून त्याच्याकडून शस्त्रं व अस्त्रं मिळवण्यासाठी युधिष्ठिराने अर्जुनाला सांगितलं.
अर्जुनाने मोठी तपश्चर्या केली आणि भगवान शंकर आणि इंद्रदेवाला त्यानं प्रसन्न केलं. त्यामुळे इंद्राचा रथ अर्जुनाला घेण्यासाठी पृथ्वीवर आला. इंद्र अमरावतीमध्ये राहत होता. तिथे इंद्राचा मोठा दरबार भरायचा. मेनका, रंभा, उर्वशी या अप्सरा तिथं सुंदर नृत्य करत असत. इंद्रानं अर्जुनाला राहण्यासाठी वेगळा महाल दिला. तिथे अर्जुनाला पाच वर्षं राहावं लागणार होतं.
इंद्राच्या आदेशानं अर्जुन गंधर्व आणि चित्रसेन यांच्याकडून नृत्य, गायन आणि वादनाचे धडेही गिरवू लागला. एके दिवशी चित्रसेनाने उर्वशीला सांगितलं, की बहुतेक अर्जुन तुझ्यावर मोहित झाला आहे. तो सतत तुझ्याकडेच पाहत असतो. त्याच्याकडे जाऊन तू भेट. चित्रसेनाचं हे बोलणं ऐकून उर्वशी आनंदित झाली. तिलाही अर्जुन मनोमन आवडू लागला होता. अर्जुनाला आपल्या मनातली भावना सांगितली पाहिजे असं तिला वाटू लागलं. त्याच दिवशी तिनं अर्जुनाकडे जायचं ठरवलं.
संध्याकाळच्या वेळी उर्वशीनं खास साजशृंगार केला व ती अर्जुनाच्या महालाकडे निघाली. द्वारपालाकरवी तिनं अर्जुनाला वर्दी पाठवली, तेव्हा अर्जुनाच्या मनात भविष्याबद्दल शंकेची पाल चुकचुकली.
उर्वशीनं अर्जुनाला तिच्या मनातली भावना बोलून दाखवली. अर्जुनाबद्दल वाटणारं प्रेम तिनं व्यक्त केलं; मात्र ते ऐकून अर्जुनाला धक्का बसला. त्यानं उर्वशीला सांगितलं, की तुम्ही माझ्या गुरूपत्नींच्या समान आहात. पुरू वंशाच्या माता आहात. त्यामुळे मी तुमचा आदर करतो. तुमच्याकडे मी तशा दृष्टीने कधीच पाहू शकत नाही; मात्र अप्सरा कोणत्याही नियमांच्या बांधील नसतात, असं उर्वशीनं सांगितलं. पुरू वंशातला जो कोणी स्वर्गात येतो, तो आमच्यासोबत मीलन करतो. तूही माझी इच्छा पूर्ण कर असं उर्वशीने अर्जुनाला सांगितलं.
मात्र अर्जुनाने पुन्हा पुन्हा उर्वशीला आदरपूर्वक नकार दिला. त्यावर उर्वशी भयंकर संतापली. खूप अपेक्षेनं मी तुझ्याकडे आले होते; मात्र तू माझ्या इच्छेचा आदर ठेवला नाहीस असं म्हणून उर्वशीनं अर्जुनाला शाप दिला. आता तू नपुंसक होऊन स्त्रियांमध्ये वावरशील असं सांगून उर्वशी तिथून निघून गेली.
उर्वशीने अर्जुनाला दिलेल्या शापाबद्दल इंद्राला समजलं तेव्हा हा शाप तुझ्या उपयोगी पडेल असं इंद्रानं अर्जुनाला सांगितलं. अज्ञातवासात एक वर्षभर तू नपुंसक बनून राहशील व त्यानंतर पुन्हा तुला पौरुषत्व प्राप्त होईल असं इंद्रानं सांगितलं.
इंद्राच्या दरबारातली एक सुंदर अप्सरा म्हणजे उर्वशी. रामायण आणि महाभारत या दोन्ही कालखंडात तिचा उल्लेख आढळतो. ती सगळ्या अप्सरांमध्ये सर्वांत सुंदर आणि कुशल नर्तकी होती. इंद्राच्या दरबारात तिला विशेष स्थान होतं. तिचा विवाह चंद्रवंशाचा पहिला राजा पुरुरवा याच्याशी झाला होता. नंतर तिनं त्याचा त्याग केला.
भागवत पुराणानुसार, ती अप्सरा उर्वशी म्हणून ओळखली जाते. कारण तिचा जन्म दैवी ऋषी नारायण यांच्या मांडीतून झाला होता. उर्वशीचा उल्लेख ऋग्वेदातही आढळतो. ऋग्वेद हा हिंदू धर्मग्रंथ असून इसवी सनाच्या आधी 1900 ते 1200 या कालावधीत झाली असावी. वसिष्ठ आणि अगस्त्य ऋषींचा जन्मात उर्वशीची महत्त्वाची भूमिका होती. कधी कधी उर्वशीला त्यांची माता म्हटलं जातं.
महाभारतातल्या पांडवांपैकी तिसरा पांडव म्हणजे अर्जुन. अर्जुनाला चार पत्नी होत्या. त्यापैकी पहिली पत्नी द्रौपदी ही सर्व पांडवांची पत्नी होती. त्याशिवाय उलूपी, चित्रांगदा आणि सुभद्रा या तिन्ही अर्जुनाच्या पत्नी होत्या. सुभद्रा ही कृष्णाची बहीण होती. अर्जुनाने रथावरून सुभद्रेचं अपहरण केलं होतं. त्यानंतर त्यांचा विवाह झाला.
उर्वशीनं दिलेल्या शापाचा उपयोग अर्जुनाला अज्ञातवासात झाला. विराटनगरीमध्ये अर्जुन बृहन्नडा म्हणून राहिला. त्यामुळे कोणी त्याला ओळखू शकलं नाही व उर्वशीनं दिलेला शापही त्यानं भोगला.