देश-विदेश

PM Modi : “मैं नरेंद्र दामोदरदास मोदी..” तिसऱ्यांदा शपथ घेत मोदी पंतप्रधानपदी विराजमान


लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज देशात एनडीएचं (PM Narendra Modi Oath) सरकार अस्तित्वात आलं. नरेंद्र मोदीयांनी सलग तिसऱ्या वेळेस देशाच्या पंतप्रधापदाची शपथ घेतली.

 

राजधानी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य खासदारांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यावेळी सत्ताधारी एनडीएच्या खासदारांसह विरोधी पक्षांतील खासदार उपस्थित होते. “मैं नरेंद्र दामोदरदास मोदी, ईश्वर की शपथ लेता हूँ की..” असे म्हणत मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. या सोहळ्यासाठी देश विदेशातील तब्बल 8 हजार पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते.

या सोहळ्यात मोदी यांच्यानंतर भाजप नेते राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, जेपी नड्डा, शिवराजसिंह चौहान, निर्मला सितारमण, डॉ. एस. जयशंकर, मनोहरलाल खट्टर, एचडी कुमारस्वामी, पियूष गोयल, धर्मेंद्र प्रधान, जीतनराम मांझी, राजीव रंजन सिंह, सर्वानंद सोनोवाल, डॉ. वीरेंद्र कुमार, राम मोहन नायडू, प्रल्हाद जोशी आदींसह अन्य खासदारांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली.

या सोहळ्यासाठी भारताशेजारील बांग्लादेश, नेपाळ, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, भूतान या देशांच्या प्रमुखांनाही आमंत्रित करण्यात आले होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ताणलेले संबंध पाहता यंदाही पाकिस्तानला निमंत्रण नव्हतं.

सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. येथे सुरक्षा व्यवस्थाही अत्यंत कडेकोट ठेवण्यात आली होती. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर होती.

सलग 13 वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री

ऑक्टोबर 2001 मध्ये मोदींनी गुजरातच्या मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली होती. डिसेंबर 2002 मध्ये गुजरातमध्ये निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपने 182 पैकी 125 जागा जिंकल्या. त्यानंतर मोदी पुन्हा मुख्यमंत्री झाले. पुढे सन 2007 आणि 2012 मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड यश मिळालं. यावेळी मोदीच मुख्यमंत्री राहिले. सर्वाधिक काळ गुजरातचे मु्ख्यमंत्री राहण्याचं रेकॉर्ड मोदींच्याच नावावर आहे.

मोदींच्या नेतृत्वात 2014, 2019 मध्ये भाजपला बहुमत

सन 2013 मध्ये भाजपने नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित केले. मे 2014 मध्ये त्यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा दिला. यानंतर आनंदीबेन पटेल मुख्यमंत्री झाल्या. 2014 मधील प्रचंड यशानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. या निवडणुकीत भाजपला 282 जागा मिळाल्या होत्या. नरेंद्र मोदी आणि भाजपाचा विजय रथ 2019 मध्येही कायम राहिला. या निवडणुकीत भाजपला तब्बल 303 जागा मिळाल्या. एनडीएला 350 पेक्षा जास्त जागा मिळाल्या. यानंतर मोदी दुसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनले.

आता सन 2024 मध्ये नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. मोदी हे एकमेव असे नेते आहेत जे इतक्या मोठ्या काळापासून सत्तेत आहेत. 2001 ते 2014 पर्यंत नरेंद्र मोदी सलग तेरा वर्ष मुख्यमंत्री होते. त्यानंतर दहा वर्ष पंतप्रधान होते. काही दिवसांपूर्वी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये केलेल्या भाषणात पुढील दहा वर्षे सत्तेत कायम राहू असा दावा त्यांनी केला होता.

आरएसएसचे स्वयंसेवक ते देशाचे पंतप्रधान

नरेंद्र मोदी यांनी आपल्या करिअरची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवक पदापासून केली होती. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाही मोदी संघ प्रचारक होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचेही ते सदस्य राहिले आहेत. 1990 च्या आधी मोदींनी राजकारणात प्रवेश केला होता. भाजपमध्ये आल्यानंतर लगेचच त्यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्याबरोबर राम रथ यात्रेत सहभाग घेतला.

गुजरातेत भाजपला मजबूत करण्यात नरेंद्र मोदींचं योगदान खूप मोठं आहे. या राजकीय काळात त्यांना अमित शहांची साथ मिळाली. नरेंद्र मोदी ज्येष्ठ नेते लालकृ्ष्ण अडवाणी आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना आपले राजकीय गुरू मानतात. माजी पंतप्रधान पंडीत नेहरू सर्वाधिक काळ देशाचे पंतप्रधान होते. यानंतर आता नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button