शेत-शिवार

अतिघन आंबा लागवड पद्धत आणि लागवडीचे फायदे…


आंबा बागेच्या लागवडीसाठी दहा बाय दहा मीटर या अंतराची शिफारस होती. मात्र पुढे प्रायोगिक घन व अतिघन लागवडीचे योग्य व्यवस्थापनातून चांगली उत्पादकता मिळू लागली आहे.

परिणामी, अतिघन लागवडीचे प्रमाण वाढत आहे. ही अतिघन आंबा लागवडीविषयी अधिक माहिती घेऊ.

हवामान व जमीन

महाराष्ट्रातील हवामान आंबा लागवडीसाठी योग्य असून, सामान्यतः सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये आंबा झाडांची वाढ चांगली होती. आंबा बागेसाठी पाण्याची शाश्‍वत उपलब्धता असावी. जमिनीची निवड करताना दहा टक्क्यांपेक्षा अधिक चुनखडी असलेली व आठ टक्क्यांपेक्षा जास्त सामू असलेली जमीन अयोग्य समजावी.

अतिघन लागवड पद्धत

आंबा बागेच्या लागवडीसाठी १९९५ पर्यंत दहा बाय दहा मीटर या अंतराची शिफारस होती. मात्र आम्ही प्रायोगिक तत्त्वावर औरंगाबाद भागामध्ये पाच बाय पाच मीटर अंतरावर घन लागवड करून पाहिली. त्याचे निष्कर्ष चांगले मिळू लागले.

२००५ मध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये आंतरराष्ट्रीय आंबा परिषदेमध्ये भाग घेऊन मी माझे तीन संशोधन पेपर सादर केले होते. त्यानंतर तिथे आम्हाला पाच हजार एकरावर १ × ४ मीटर आणि १.५ × ६ मीटर इतकी अतिघन लागवडीची एक बाग पाहण्यास मिळाली. ही त्या वेळी पंधरा वर्षे जुनी बाग होती. तिची एकरी उत्पादकता २० ते २२ टन असल्याचे समजले.

भारतात परत आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये मी काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दोन बाय चार मीटर, तर काही ठिकाणी दीड बाय चार मीटर अंतरावर प्रायोगिक तत्त्वावर लागवडीस सुरुवात केली. योग्य व्यवस्थापनातून ही लागवड यशस्वी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर रुईभर (जि. धाराशिव) येथील अविनाश चव्हाण, ढाकेफळ (जि. छत्रपती संभाजीनगर) येथील नाथ सीड कंपनीच्या शेतावर रसूल शेख यांनी २००६-०७ मध्ये अतिघन आंबा लागवड केली.

या लागवडीतून एकरी उत्पादकतेमध्ये २५ टक्क्यांपर्यंत वाढ होत असल्याचे दिसून आले. परिणामी, या पद्धतीच प्रसार वेगाने होऊ लागला. तमिळनाडू येथील कृषी विद्यापीठाने, तसेच कर्नाटक आणि आणि कोकणवगळता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही लागवड आता यशस्वी होताना दिसत आहे.

अतिघन लागवडीचे फायदे

सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त उपयोग करता येतो.

कार्बन डायऑक्साइड हा वायू जड असून वातावरणात खालच्या थरात जास्त असतो. त्यामुळे खालील फांद्यातील पानांमध्ये प्रकाश संश्‍लेषण जास्त चांगले होते.

बाग लवकर फळावर येते. लवकर म्हणजे तिसऱ्याच वर्षी आर्थिक उत्पादन मिळण्यास सुरुवात होते.

बागेमध्ये आंतरमशागत, फवारणी व फळांच्या वाहतुकीसह अन्य कामांसाठी छोटा ट्रॅक्टर वापरणे सोयीचे ठरते.

जमीन आणि उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर शक्य.

एकरी अधिक उत्पादनासह (सरासरी ८ ते १० टन) उत्तम प्रतीची निर्यातक्षम फळे मिळतात.

Mango Cultivation : अत्याधुनिक अतिघन आंबा लागवड
अतिघन लागवडीच्या मर्यादा

 

अतिघन फळबागेमध्ये व्यवस्थापन विशेषतः छाटणी व अन्य कामे अत्यंत काटेकोर व वेळच्या वेळी करण्याची आवश्यकता असते.

बागेच्या उभारणीमध्ये सुरुवातीच्या काळात अधिक खर्च होतो. विशेषतः फळझाडांचा सांगाडा तयार करणे, घेर नियंत्रण हे थोडे कौशल्याचे काम असते.

बागेचे आयुष्यमान तुलनेने कमी असते. (साधारण २५ ते ३० वर्षे, मात्र आपल्याकडे इतक्या जुन्या बागा नसल्यामुळे त्याबाबत प्रत्यक्ष अनुभव नाही. पंधरा वर्षे जुन्या बागा चांगल्या प्रकारे उत्पादनक्षम आहेत.)

प्रत्यक्ष लागवड

२००६ पासून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वेगवेगळ्या अंतरावर केलेल्या अतिघन आंबा लागवडीचा तुलनात्मक अभ्यास केला असता त्यातील सर्वांच फायदेशीर लागवड ही दक्षिण – उत्तर दिशेने पाच ते सहा फूट, तर पूर्व – पश्‍चिम १३ ते १५ फूट या अंतरावरील लागवड असल्याचे दिसून आले. या पद्धतीमध्ये एकरी ५०० ते ६६६ झाडे बसतात.

या लागवडीसाठी १ × १ मीटरचा खड्डा प्रत्येक ठिकाणी घेत बसण्यापेक्षा सरळ उत्तर- दक्षिण पद्धतीने १ × १ मीटरची खोदयंत्राच्या मोठ्या बकेटने चर किंवा नाली तयार करून घ्यावी. आपली जमिनी काळी व भारी असल्यास काढलेली पहिली बकेट एका बाजूला टाकावी, तर त्या खालील नंतरची बकेट दुसऱ्या बाजूला टाकावी.

यावरील बकेटच्या मातीच्या ढिगामध्ये नंतर तितक्याच किंवा अर्ध्या प्रमाणात चांगला मुरूम मिसळून नाली भरून घ्यावी. नाली भरताना जिथे आपण झाड लावणार आहोत, त्या भागामध्ये शिफारशीप्रमाणे दीड ते दोन किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि दीड ते दोन टोपले चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. नंतर नाली भरून घ्यावी. नाली भरताना एक ते दीड फुटाचा गादीवाफा तयार होईल असे पाहावे.

त्यासाठी जास्तीची माती लागल्यास आजूबाजूचे वरील जमिनीचे फूल ओढून घ्यावे. नंतर आपण जी खालच्या बकेट दुसऱ्या बाजूला टाकली होती, ती जमिनीवर अलगद पसरून द्यावी. या अतिखोल मातीमध्ये सूक्ष्मजीवांचा प्रमाण तुलनेने कमी असल्याने कमी सुपीक किंवा मृत असते. त्यात पुढील दोन – तीन वर्षांत सेंद्रिय पदार्थ मिसळत राहिल्यास ती जिवंत होण्यास मदत होते.

जमीन सर्वसाधारण असल्यास फक्त नाली करावी. परत सर्व मातीने नाली भरून घ्यावी. वेगळी माती किंवा मुरूम मिसळण्याची गरज नाही.

आपली जमीन अतिशय हलकी, मुरमाड असल्यास खोदयंत्राने खोदल्यानंतर त्या मातीमध्ये साधारणतः चाळीस-पन्नास टक्के इतकी काळी सुपीक माती किंवा धरणातील गाळ मिसळावा. नाली जमिनीच्या वर एक ते दीड फूट गादीवाफा होईल अशी भरून घ्यावी.

कलमांची निवड

आंबा लागवडीसाठी कलम निवडताना अतिशय जोमदार वाढलेले, कमीत कमी आठ नऊ महिन्यांपूर्वी कलमीकरण केलेले, दीड ते दोन फूट उंचीचे कलम निवडावे.

फेल झालेल्या ठिकाणी पुन्हा पुन्हा कलम केलेली, खुंटलेल्या वाढीची कलमे प्रकर्षाने टाळावीत.

ज्या बागेतून कलमे घेणार आहोत, त्या बागेतील मातृवृक्ष निरोगी असावी. विशेषतः पर्णगुच्छ विरहित असणे गरजेचे आहे. कारण राज्यातील केसर आंबा बागांमध्ये पर्णगुच्छ रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे.

कलम लागवड

योग्य पद्धतीने नाली करून भरलेल्या ठिकाणी चांगला पाऊस पडून गेल्यानंतर किंवा सिंचनाद्वारे नाली भिजवून घेतल्यानंतर कलम लागवड करावी. अशा वेळी मार्किंग केलेल्या कलम लागवडीच्या ठिकाणी कलमाची पिशवी बसेल, एवढा लहानसा खड्डा करावा.

त्यामध्ये २५० ग्रॅम निंबोळी पेंड, २५ ग्रॅम ट्रायकोडर्मा, २५ ग्रॅम ॲझेटोबॅक्टर, २५ ग्रॅम पीएसबी आणि २५ ग्रॅम रायझोबिअम जिवाणू संवर्धक मिसळून घ्यावे. त्यात कलम लागवड करावी. लागवड केल्यानंतर बाजूची माती उभे राहून पायाने चांगली दाबून घ्यावी. मोकळ्या मातीतील हवा निघून जाईल व मुळे पसरण्यास योग्य वातावरण तयार होईल.

आच्छादन

पावसाळा संपल्यानंतर बागेत कलमांना वाळलेला पालापाचोळा गवत किंवा उसाचे पाचटाचे आच्छादन करावे. आच्छादनामुळे पाण्याची बचत होते. तसेच जमिनीचे तापमान व ओलावा योग्य राहण्यास मदत होते. परिणामी मुळे नेहमी क्रियाशील राहतात.

पिशवीमध्ये केलेल्या कलमांचे मूळ हे गुंडाळलेले असू शकते. प्रत्यक्ष जमिनीमध्ये लागवड केल्यानंतर असे सोटमूळ खाली खोलवर जात नाही. अशी झाडे पुढील काळात पाण्याचा ताण, वादळ वारे यांचा वेग किंवा अन्य ताण सहन करू शकत नाहीत.

ही मर्यादा टाळण्यासाठी २००० मध्ये जिरडगाव (जि. जालना) येथील गटशेतीमध्ये प्रस्तुत लेखकांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या शेतकरी गटाच्या ५०० एकरांवर प्रत्यक्ष जागेवर देशी झाडे लावून त्यावर कलम करण्याची पद्धत (इनसिटू) राबवली.

या पद्धतीमध्ये जागेवर तीन ते चार ताज्या कोयीची लागवड केली जाते. त्या वाढल्यानंतर सप्टेंबरमध्ये किंवा फेब्रुवारीमध्ये आपल्या हव्या त्या जातीचे कलम केले जाते. बाजूला राहिलेले रोप परत त्याला जोडले जाते. अशा बऱ्याच ठिकाणी दोन खोडाचा जोड तिथे येतो. ही पद्धत चांगली आहे, परंतु यामुळे साधारणतः फळ यायला एक वर्ष उशीर लागतो.

पुढे हा वेळ कमी करण्यासाठी त्यातही कलम लागवड आणि इनसिटूचे फायदे मिळविण्याच्या उद्देशाने एकत्रित पद्धत तयार केली. या पद्धतीमध्ये कलम लागवड करतानाच कलमाच्या बाजूला ताज्या तीन कोयी लावायच्या.

या कोयी उगवून चांगल्या वाढल्यानंतर साधारणतः सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये किंवा फेब्रुवारीमध्ये त्याचा शेंडा मारून उलटी पाचर तयार करायची. आपण लावलेल्या कलमाला त्या उंचीवर उलटा कट देऊन त्यामध्ये ही पाचर बसवून बांधून घ्यायची. यात योग्य पाणी व्यवस्थापन केल्यास शंभर टक्के यश मिळते.

लागवडीनंतर कलमांची निगा

लागवडीनंतर सुरुवातीच्या काळात कलमांची योग्य काळजी घेणे आवश्यक ठरते.

कलमांना दोन बाजूला दोन काठ्या रोवून त्यावर आडव्या काठ्या बांधाव्यात. तयार झालेल्या शिरीसारख्या आधाराला कलम दोन ठिकाणी सैलसर बांधून घ्यावे.

कलमांना ठिबकद्वारे पाणी देताना कलमाच्या दोन्ही बाजूंनी पाणी मिळावे, यासाठी सुरुवातीला दोन ड्रीपर असावेत.

बागेचे भटकी जनावरे, रानडुक्कर इ. पासून संरक्षण करावे. बागेला कुंपण आवश्यक ठरते.

कलमांचे आंतरमशागतीच्या औतापासून नुकसान पोहोचणार नाही, यासाठी काळजी घ्यावी.

कलमांना घन खते किंवा विद्राव्य खते शिफारशीप्रमाणे द्यावीत. (वेळापत्रक पाहावे.)

बागेमध्ये कमी उंचीचे असलेले आंतरपीक घ्यावे. एखाद्या वेळी पावसाळ्यात आंतरपीक नसले तरी चालेल, परंतु उन्हाळ्यात पहिल्या व दुसऱ्या वर्षी कमी उंचीचे आंतरपीक घ्यावे. याचा आंबा झाडांच्या जोमदार वाढीसाठी फायदा होऊ शकतो.

नवीन लागवडीत सप्टेंबरपर्यंत छाटणीची फारशी आवश्यकता नसते. सप्टेंबरमध्ये मात्र गरजेप्रमाणे छाटणी घ्यावी.

नवीन बागेमध्ये पाने खाणारी अळी, रसशोषक किडी, शेंडे अळी या किडी व करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यांचे वेळच्या वेळी नियंत्रण करावे.

बागेभोवती उंच वाढणाऱ्या सदाहरित वृक्षांची वारा प्रतिबंधक म्हणून लागवड करावी. त्यामुळे बागेचे उष्ण वाऱ्यापासून रक्षण होते. आंब्याची प्रत चांगली मिळण्यास मदत होते.

डॉ. भगवानराव कापसे, ९४२२२९३४१९ , लेखक निवृत्त फळबाग शास्त्रज्ञ आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button