मुस्लिम महिलांनी मतं तर दिली, आता ‘गॅरंटी कार्ड’ घेण्यासाठी काँग्रेस कार्यालयाबाहेर रांगा
लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर आला असून एनडीए देशात सत्ता स्थापन करणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे. अशातच इंडी आघाडीनेही २०० हून अधिक जागा देशात मिळवल्या आहेत.
अशातच आता इंडी आघाडीच्या वचननाम्याबद्दल नवी माहिती समोर आली आहे. इंडी आघाडीला विशेषतः उत्तर प्रदेशमध्ये चांगले यश मिळाले आहे. यामुळे लखनऊमधील अनेक महिलांनी प्रचारादरम्यान काँग्रेस पक्षाने वचन दिलेल्या ‘गॅरंटी कार्ड्स’ची मागणी करत काँग्रेस कार्यालयाबाहेर रांगा लावल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून काँग्रेस पक्ष तीन अंकी आकडाही गाठू शकला नसला तरी निवडणुकीत राहुल गांधींनी मालमत्ता वाटपासह अनेक मोठी आश्वासने दिली होती. आता उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील काँग्रेस मुख्यालयाबाहेर मुस्लीम महिलांची मोठी रांग लागली आहे. हे सर्वजण एक लाख रुपयांची मागणी करत असून, त्यांना आर्थिक लाभ द्या, असेही त्या सांगत आहेत.
काँग्रेसच्या आश्वासनानंतर आता मुस्लिम महिला आपली ओळखपत्रे आणि इतर कागदपत्रे घेऊन पक्ष कार्यालयात पोहोचल्या आहेत. या महिलांच्या हातात काँग्रेसचे ‘गॅरंटी कार्ड’ही आहे, ज्यामध्ये प्रत्येक सुशिक्षित तरुणाला एक लाख रुपयांच्या पगाराव्यतिरिक्त कायमस्वरूपी नोकरीचे आश्वासन देण्यात आले आहे. या हमीपत्रात कर्जमाफीचे आश्वासनही काँग्रेसकडून देण्यात आले आहे.
‘इंडिया टुडे’च्या अहवालानुसार, तस्लीम नावाच्या महिलेने सांगितले की, तिला काँग्रेस कार्यालयाकडून अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही. अनेक फॉर्म जमा झाले असून त्यांना स्लिपही देण्यात आली आहे. अनेक महिलांनी त्यांना कार्ड मिळाले नसल्याचे सांगितले तसेच, अनेकांना दुपारी येण्यास सांगितले. मुस्लिम महिलांनीही ही कार्डे भरली असून अनेकांची रक्कम जमा होत नसून ही प्रदीर्घ प्रक्रिया असल्याचे बोलले जात आहे.
निवडणुकीपूर्वी काँग्रेसने प्रत्येक गरीब कुटुंबातील महिला प्रमुखाला दरवर्षी १ लाख रुपये देण्याचे आश्वासन देत अनेक घरांना ‘गॅरंटी कार्ड’ वितरित केले होते काही महिलांनी ‘गॅरंटी कार्ड’ची मागणी केली, तर ज्यांना ते मिळाले त्यांनी त्यांच्या खात्यात पैसे मिळण्यासाठी फॉर्म जमा केले. काही महिलांनी दावा केला की, पैसे मिळविण्यासाठी तपशीलांसह फॉर्म सबमिट केल्यानंतर त्यांना काँग्रेस कार्यालयातून पावत्या मिळाल्या आहेत.
अलीकडेच, बेंगळुरूमधील जनरल पोस्ट ऑफिसमध्ये अनेक महिला खाती उघडण्यासाठी पोहचल्या होत्या. केंद्रात इंडी गट सत्तेवर आल्यास त्यांच्या खात्यात महिन्याला ८,५०० रुपये जमा होतील या अपेक्षेने अनेक महिला खाती उघडण्यासाठी पोहचल्या होत्या.