जनरल नॉलेजशेत-शिवार

मान्सून का महत्त्वाचा ! मान्सून कुठे तयार होतो?मान्सूनमुळे किती पाऊस पडतो?


 

विशिष्ट मोसमात भारताच्या नैर्ऋत्य दिशेकडून येऊन भारताला धङकणाऱ्या आणि सोबत भरपूर पाणी पाऊस घेऊन येणाऱ्या वाऱ्यांना नैर्ऋत्य मोसमी वारे म्हणतात.

कर्नाटक, तामीळनाडू, आंध्र प्रदेश, आसाम व ईशान्येकडील राज्यांत दाखल होतो. नंतर प्रवास करत तो १० जूनला महाराष्ट्र, छत्तीसगड, प. बंगाल, बिहार राज्यात दाखल होतो. त्यानंतर मान्सून १५ जूनपर्यंत गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, हिमाचल प्रदेश,राजस्थान व उत्तर प्रदेशचा काही भागात प्रवेश करतो. एक जुलैला उर्वरित राजस्थान व उत्तर प्रदेशसह हरियाणा,पंजाब,जम्मू-काश्मीरसह मान्सून दाखल होतो. मान्सूनला दाखल होण्याला ऑनसेट ऑफ मान्सून असे संबोधतात. दरवर्षी मान्सून या ठरावीक तारखेलाच येतो असे होत नाही. काही वेळा केरळात मान्सून दोन-चार दिवस आधी किवा पाच ते सहा दिवस विलंबाने दाखल होतो. यालाच मान्सून यंदा लवकर आला किंवा उशिरा आला असे म्हटले जाते.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) मान्सूनच्या दृष्टीने देशाचे चार प्रमुख विभाग आणि ३६ उपविभाग केले आहेत. चार प्रमुख विभाग असे : वायव्य भारत, मध्य भारत, पूर्व व ईशान्य भारत आणि दक्षिण भारत. आयएमडीच्या मते देशात सर्वसाधारणपणे सरासरी ८८७.५ मिमी पाऊस पडतो. वायव्य भारत विभागाची सरासरी ६१५.० मिमी, मध्यभारत विभागाची ९७५.५ मिमी, पूर्व व ईशान्य भारत १४३८.३ मिमी तर दक्षिण भारत विभागाची सरासरी ७१६.१ मिमी मानली आहे. आयएमडीने महिनेवार पावसाची सरासरी ही निश्चित केलेली आहे. त्यानुसार देशात जूनमध्ये सरासरी १६३.६ मिमी, जुलैमध्ये २८९.२ मिमी, ऑगस्टमध्ये २६१.३ मिमी तर सप्टेंबरमध्ये सरासरी १७३.४ मिमी पाऊस पडतो. विभागवार पुन्हा या पावसाचे वितरण दरवर्षी सरासरी इतकेच राहील हे मात्र निश्चित नाही. महाराष्ट्राचे चार उपविभाग केले आहेत. कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ. त्यानुसार त्या-त्या उपभागात पडणाऱ्या पावसाची नोंद केली जाते. आयएमडीने महाराष्ट्रातील उप विभागवार पडणाऱ्या पावसानुसार सरासरी ठरवलेली आहे. त्यानुसार जून ते सप्टेंबर या काळात कोकण व गोवा उप विभागात सरासरी २९१५ मिमी, मध्य महाराष्ट्रात ७२९ मिमी, मराठवाड्यात ६८३ मिमी तर विदर्भात ९५५ मिमी पाऊस पडतो. यानुसार त्या त्या वर्षी त्या त्या उप विभागात किती पाऊस झाला हे ठरते. (संकलन : अजय कुलकर्णी)

पर्जन्यछायेचा प्रदेश

भारतात मान्सूनच्या प्रामुख्याने दोन शाखा आहेत. एक शाखा बंगालच्या उपसागरातून कार्यरत राहते तर दुसरी शाखा अरबी समुद्राकडून. महाराष्ट्रातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा यांतील काही जिल्ह्यांना मुख्यत: अरबी समुद्रातील शाखेकडून पावसाचा लाभ होतो. तर विदर्भाला बंगालच्या उपसागरातील शाखेकडून लाभ होतो. महाराष्ट्रात सह्याद्री किवा पश्चिम घाट हा पावसाचा दुभाजक म्हणून काम करतो. या पर्वतरांगामुळे कोकणात जोरदार पर्जन्यवृष्टी होते. तर पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात त्या तुलनेत कमी पाऊस पडतो. बाष्पयुक्त वारे सह्याद्रीच्या पर्वतरांगाना अडतात आणि घाटमाथा व कोकणात भरपूर पाऊस देता . मात्र पुढे पश्चिम महाराष्ट्रातील मुख्यत: अहमदनगर, सांगली, सोलापूर जिल्हे आणि मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, बीड, औरंगाबाद, जालना या जिल्ह्यात येईपर्यंत या मोसमी वाऱ्यांतील बाष्पाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे या भागाला पर्जन्यछायेचा प्रदेश असे म्हणतात. याची प्रचिती कोल्हापूर मधील शिरोळ तालुक्यात देखील पाहायला मिळते शिरोळ तालुक्यात जांभळी गावात तुफान पाऊस पडतो पण तोच जयसिंगपूर व शिरोळ मध्ये पावसाचा जोर कमी होतो. आश्चर्य म्हणजे जांभळी आणि जयसिंगपूर मधील अंतर हे केवळ ६ किलोमीटर इतके आहे

 

मान्सूनचे दोन प्रकार कोणते?

भारतात जून ते सप्टेंबर या काळात वारे नैऋत्य दिशेकडून म्हणजे साधारण अरबी समुद्राकडून हिमालयाकडे वाहतात. या वाऱ्यांना नैऋत्य मोसमी वारे किंवा नैऋत्य मान्सून (साऊथ-वेस्ट मान्सून) म्हणून ओळखतात. तर ऑक्टोबर महिन्यात वारे याच्या उलट दिशेने म्हणजे ईशान्येकडून वाहतात. त्यांना ईशान्य मोसमी वारे किंवा ईशान्य मान्सून (नॉर्थ वेस्ट मान्सून) म्हणतात. या वाऱ्यांमुळे ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात प्रामुख्यानं दक्षिण भारतात पाऊस पडतो.

मान्सून कुठे तयार होतो?

मान्सूनची निर्मिती कशामुळे होते, याविषयी काही सिद्धांत आहेत. पृथ्वी 21 अंशांमध्ये कलली आहे. त्यामुळे तिचा उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेला असतो. परिणामी उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो, तेव्हा दक्षिण गोलार्धात थंडी असते. जास्त तापमान असतं तिथे हवेचा दाब कमी तर कमी तापमानाच्या ठिकाणी हवेचा दाब जास्त असतो. वारे नेहमी जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहतात. जमिनीपेक्षा समुद्राचं तापमान थोडं थंड असतं, त्यावेळी समुद्राकडून वारे वाहू लागतात. येताना हे वारे समुद्रावरचं बाष्प आणतात, त्यातून पाऊस पडतो. पण हे असं चित्र पृथ्वीच्या इतर अनेक ठिकाणी होतं. मात्र भारतीय उपखंडातली स्थिती थोडी खास बनवते.

भारतीय द्वीपकल्पाचा आकार मोठा असून ऊन्हाळ्याच्या दिवसांत इथलं तापमान वेगानं खूप वाढतं आणि जमीनही तापते. विशेषतः मे महिन्या पर्यंत राजस्थानच्या वाळवंटात उष्णता वाढते. त्याच वेळी अरबी समुद्राच्या आसपासच्या प्रदेशात म्हणजे आफ्रिका, सौदी अरेबियन द्वीपकल्प यांचं तापमानही वाढतं. परिणामी हिंदी महासागरातून उत्तर गोलार्धात आलेले वारे भारतीय द्वीपकल्पाकडे वाहू लागतात. या वाऱ्यांसोबत मोठ्या प्रमाणात बाष्पही येतं. त्यातून ढगांची निर्मिती होते आणि पाऊस पडतो. ऑक्टोबर उजाडेपर्यंत तापमान आणि वाऱ्यांच्या दिशेचं गणित बदलतं, वारे ईशान्येकडून वाहू लागतात.

मान्सूनमुळे किती पाऊस पडतो?

भारतात साधारण 80 टक्के पाऊस हा नैऋत्य मान्सूनमुळे पडतो तर साधारण 11% पाऊस ईशान्य मान्सूनमुळे पडतो असं हवामान खात्याच्या नोंदी सांगतात. भारतात जून ते सप्टेंबर या काळात सरासरी 87 सेंटीमीटर एवढा पाऊस पडतो.

मान्सून ऑनसेट म्हणजे काय?

फक्त पाऊस आला, म्हणजे मान्सूनची सुरुवात झाली, असं नसतं. तर एखाद्या ठिकाणी विशिष्ठ कालावधीतील पावसाचं प्रमाण, वाऱ्याचा वेग आणि तापमानाची स्थिती पाहून हवामान विभागाचे तज्ज्ञ त्या ठिकाणी मान्सून ऑनसेट झाल्याचं म्हणजे मान्सूनची सुरूवात झाल्याचं जाहीर करतात. केरळ आणि लक्षद्वीपमधल्या 14 ठराविक हवामान केंद्रांपैकी किमान 60 टक्के म्हणजे 9 केंद्रांवर ठिकाणी 10 मे नंतर कधीही सलग दोन दिवस 2.5 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली, तर तिथे मान्सून दाखल झाल्याचं हवामान विभाग जाहीर करतो. साधारणपणे केरळमध्ये 1 जूनच्या आसपास मान्सून दाखल होतो. तिथून 7 ते 10 जूनपर्यंत मुंबईत आणि 15 जुलैपर्यंत संपूर्ण भारतात पसरतो. नैऋत्य मान्सूनच्या दोन शाखा आहेत – एक अरबी समुद्रातली आणि दुसरी बंगालच्या उपसागरातली. तर ईशान्य मान्सून साधारण 20 ऑक्टोबरच्या आसपास सक्रीय होतो.

मान्सून का महत्त्वाचा

जून- सप्टेंबर या मान्सूनच्या काळात साधारणपणे वर्षभरातील 70 टक्के पाऊस पडतो. यामुळे शेतीसोबतच, नद्या, धरणं, तलाव, विहरी भरण्यासाठी मान्सून महत्त्वाचा ठरतो. मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसामुळे तीव्र उष्णतेपासून सुटका होते. पण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनंही मान्सून महत्त्वाचा आहे. दक्षिण आशियातल्या अर्थव्यवस्था त्यावर अवलंबून आहेत. भारतासारख्या शेतीप्रधान देशात आजही अनेक गणितं पावसावर अवलंबून असतात. एका रिपोर्टनुसार भारतातील जवळपास अर्धी शेती ही मान्सूनवरच्या पावसावर अवलंबून आहे. भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी मान्सून ही लाइफलाईन मानली जाते. कमी किंवा जास्त पावसानं शेतीचं नुकसान होतं. 1925 मध्येे ब्रिटनच्या रॉयल कममिशन ऑन अॅग्रिल्चर इन इंडियानं एका अहवालात भारतीय अर्थव्यवस्था म्हणजेे मान्सूनचा जुगार असल्याचं म्हटलं होतं. शंभर वर्षांनंतरही परिस्थिती बदललेली नाही.

एल निनो, ला निना आणि मान्सून

एल-निनो आणि ला-निना ही पॅसिफिक महासागरातल्या सागरी प्रवाहांच्या विशिष्ट स्थितींची नावं आहेत. पॅसिफिक महासागरात दक्षिण अमेरिकेच्या आसपास पाण्याचे तापमान जेव्हा नेहमीपेक्षा वाढते आणि ते गरम पाणी पश्चिमेला आशियाकडे सरकते, तेव्हा त्या स्थितीला ‘एल-निनो’ असं संबोधलं जातं. ला निना ही त्याउलट स्थिती आहे. या एल निनो आणि ला निना प्रवाहांचा जगभरातल्या हवामानावर आणि भारतातल्या मान्सूनवरही परिणाम होताना दिसतो. साधारणपणे भारतात एल निनोच्या काळात कमी तर ला निनाच्या काळात जास्त पाऊस पडताना दिसतो. पण फक्त एकट्या एल निनोमुळे मान्सूनवर परिणाम होत नाही. तर एल निनोसारखाच हिंदी महासागरात इंडियन ओशन डायपोल अर्थात IOD हा प्रवाहही महत्त्वाचा ठरतो. IOD सकारात्मक असतो, म्हणजे पश्चिम हिंदी महासागराचं तापमान पूर्वेपेक्षा जास्त असतं, तेव्हा ती स्थिती भारतात मान्सूनला पोषक ठरताना दिसते. त्याशिवाय जेट स्ट्रीम या वातावरणाच्या वरच्या थरातील हवेच्या प्रवाहाचाही मान्सूनवर परिणाम होतो.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button