क्राईम

भर झोपेत कुऱ्हाडीने वार करुन पत्नीचा खून, पतीला अटक


 



गडचिरोली : पत्नी आणि आठ वर्षाची मुलगी झोपेत असताना पहाटे ३च्या सुमारास पतीने कुऱ्हाडीने वार करुन पत्नीचा खून केला. ही थरारक घटना बेतकाठी (कोरची) या गावात घडली. अमरोतीन रोहिदास बंजार (वय ३३) असे मृत पत्नीचे, तर रोहिदास बिरसिंग बंजार (वय ४०)असे आरोपी पतीचे नाव आहे.

 

पोलिसांनी रोहिदासला अटक केली आहे.

 

२००९ मध्ये रोहिदास व अमरोतीन यांचे लग्न झाले. त्यांना ४ मुली आहेत. नवव्या वर्गात शिकणारी मोठी मुलगी ही घटनेच्या वेळी छत्तीसगडला आपल्या मामाच्या गावी गेली होती, तर मधल्या दोन मुली आपल्या आजीच्या घरी झोपल्या होत्या. घरी रोहिदास, अमरोतीन आणि सर्वात लहान मुलगी झोपले होते.

 

पहाटे तीन वाजताच्या सुमारास रोहिदासने अमरोतीनच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करुन ठार केले. यात ती जागीच मृत्यू झाला. त्यानंतर रक्ताने माखलेली कुऱ्हाड घेऊन रोहिदास बाजार चौकात गेला. काही वेळाने कुऱ्हाड पाण्याने धुऊन ती घरामागच्या झुडुपात फेकली. लहान मुलीने आईचा खून झाल्याचे बघताच आक्रोश केला. तिच्या रडण्याने शेजारच्या घरात राहणारा रोहिदासचा मोठा भाऊ नोहारसिंग जागा झाला. त्याने काही युवकांच्या मदतीने रोहिदासला पकडून खुर्चीत बसवून खांबाला बांधून ठेवत पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्याला अटक असून पोलिीस निरीक्षक चंद्रकांत वाबळे घटनेचा तपास करीत आहेत.

 

रोहिदासने आधीही केली होती मारहाण

 

रोहिदास बंजार याने चार वर्षांपूर्वी पत्नीला मारहाण केली होती. तेव्हा गावात बैठक घेऊन त्याची समजूत काढण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वी तो बोअरवेलचे काम करण्यासाठी छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव येथे गेला होता. तेथेही त्याने आपल्या मालकाला मारहाण केली होती. मालकाने त्याला आठ दिवसांपूर्वीच बेतकाठी येथे आणून सोडले होते, अशी माहिती आहे.

 

चारही मुली आईच्या प्रेमाला पोरक्या

 

रोहिदास आणि अमरोतीन यांना चार मुली आहेत. १५ वर्षीय माधुरी नववीत, १३ वर्षीय मनिषा सातवीत, ११ वर्षीय कौशल्या पाचवीत, तर ८ वर्षीय वैशाली दुसऱ्या वर्गात शिकत आहे. आईचा खून झाल्याने चारही मुली सैरभैर झाल्या. त्यांचे हुंदके बघून गाव सुन्न झाले.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button