बाजारात आहे ‘बनाना मँगो’ची चर्चा; केळं की आंबा नक्की कशाची येते चव?
आंबा हा फळांचा राजा आहे. भारत हा आंब्याचा देश म्हणून ओळखला जातो, असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. भारतीय लोकांमध्ये आंब्याची विशेष क्रेझ पाहायला मिळते. उन्हाळ्यात आंबा खाल्ला नाही तर काहीच खाल्लं नाही असं समजलं जातं.
भारतात दोन प्रकारचे आंबाप्रेमी आहेत. यापैकी एक गट हा बाजारात 100 प्रकारचे आंबे असले तरी नेहमी दशहरी, हापूस, सफेद किंवा लंगडा आंबाच खरेदी करतो. आंबा प्रेमींचा दुसरा गट हा जरा वेगळा विचार करणारा असतो. बाजारात एखाद्या नवीन जातीचा आंबा आला तर तो कितीही महाग असला तरी एकदा चव चाखण्यासाठी खरेदी करणारा हा गट असतो.
भारतात फार पूर्वीपासून आंब्याची शेती केली जाते. पण देशात गेल्या काही वर्षांत परदेशातील आंबा वाणांचे उत्पादन घेतले जात आहे. इतकंच नाहीतर जगातील सर्वात महाग आंब्याचे उत्पादन देखील आता भारतात होते. भारतात आता देशी आणि परदेशी मिळून 100 पेक्षा जास्त आंबा वाणांचं उत्पादन घेतलं जातं. आज आम्ही तुम्हाला अशाच एका परदेशातील आंबा वाणाविषयी माहिती देत आहोत. या आंब्याचे आता भारतात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात असून तो गोडीच्या बाबतीत दशहरी आंब्याला टक्कर देतो. पश्चिम बंगालमध्ये या खास आंब्याची मोठ्याप्रमाणावर शेती केली जाते. या आंब्याचं नाव ‘बनाना मँगो’ अर्थात केळी आंबा आहे. या आंब्याचा आकार केळासारखा असतो. कोकणातही याची झाडं आहेत त्याला केळांबाही म्हणतात. खरं तर ही दोन फळं नसून दोन फळांच्या नावापासून एकाच फळाला नाव देण्यात आलं आहे. हा आंबा चवीला खूप गोड असल्याने तो लोकांच्या पसंतीस उतरत आहे. या बनाना मँगोविषयी सविस्तर जाणून घेऊया.
या देशात लोकप्रिय आहे हा आंबा
बनाना मँगो हे थायलंडमध्ये सहज उपलब्ध होणारं आंबा वाण आहे. त्यामुळे त्याला थाई बनाना मँगो असं देखील म्हणतात. या आंब्याचे उत्पादन पश्चिम बंगालमध्ये देखील होतं. या आंब्याचा आकार केळीसारखा असल्याने त्याला बनाना मँगो असं म्हटलं जातं. हा एक आंबा सुमारे सात ते आठ इंच लांब असतो.
कशी आहे चव?
या आंब्याची चव खूप गोड असते. ज्या लोकांनी या आंब्याची चव चाखली आहे, ते सांगतात की हा आंबा दशहरीसारखा गोड असतो. पण याचा वास एकदम वेगळा असतो. हे बनाना मँगोचे वेगळेपण आहे. या आंब्याची कोय एकदम बारीक असते. हा आंबा बारीक आणि लांब असला तरी एका आंब्याचं वजन इतकं असतं की एका किलोत केवळ तीन आंबे बसतात. यात व्हिटॅमिन ए, सी आणि बी6 असतं. याशिवाय त्यात पोटॅशियम, लोह आणि मॅग्नेशियम असतं. त्याची चव अप्रतिम असते.
भारतात या ठिकाणी होते उत्पादन
पश्चिम बंगालमधील खरगपूरमधील आंबा रोपवाटिकेतून देशभरात देशी आणि परदेशी 80 पेक्षा जास्त आंबा वाणांची विक्री करणारे आणि मँगो मॅन म्हणून ओळखले जाणारे अशोक मेती म्हणाले की, बनाना मँगो हा थायलंडचा आंबा आहे. पण आता भारतात देखील त्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. याचं झाड दशहरी आंब्याच्या झाडासारखं असतं. या झाडाला दोन वर्षांनंतर आंबा यायला सुरुवात होते. भारतीय हवामानात हा आंबा सहज येतो. पश्चिम बंगालमध्ये बनाना मँगोची झाडं मोठ्या प्रमाणावर लावली जात आहेत. तसंच हा आंबा आता इतर अनेक राज्यांतही पिकवला जात आहे.
काय आहे किंमत?
हा आंबा अद्याप सर्वसामान्य बाजारात उपलब्ध नसल्याने त्याचा दर सांगणं काहीसं कठीण आहे. पण हा आंबा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर किंवा आयात अथवा निर्यातक्षम फळांच्या दुकानात सहजपणे मिळू शकतो.अनेक ठिकाणी हा आंबा 250 ते 300 रुपये प्रति नग या दराने मिळतो. पण ज्या ठिकाणी या आंब्याचे उत्पादन होते, तिथं तो स्वस्त मिळतो.