पत्नी, आई, बहीण, भाची, पुतणी सगळ्यांना मारलं, तरुणाने कुटुंबातील 8 जणांना संपवलं

मध्य प्रदेश : एका आदिवासी तरुणाने कुऱ्हाडीने हल्ला करून त्याच्या कुटुंबातील 8 जणांची हत्या केल्याची धक्कादायक घटना छिंदवाडा (chhindwara) जिल्ह्यातील बोदल कचर गावात घडली आहे. आठ जणांची हत्या केल्यानंतर तरुणानेही गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
या घटनेत एक 10 वर्षांचा मुलगा बचावला आहे. त्याच्या जबड्यावर कुऱ्हाडीने वार केले आहेत, त्याच्या आजीने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मुलगा पळून गेला. संपूर्ण कुटुंबात तो एकटाच मुलगा आता जीवित आहे. या सामुहिक हत्याकांडाने मध्य प्रदेश (Madhya Pradesh) हादरले आहे.
आरोपीच नाव दिनेश (27) आहे. मानसिक स्थिती ठीक नसलेल्या दिनेशने आधी कुऱ्हाडीने वार करून कुटुंबाची हत्या केली. त्यानंतर आरोपीने मोठ्या भावाच्या घरात जाऊन कुटुंबीयांची हत्या केली. सर्वप्रथम त्याने 10 वर्षाच्या मुलावर कुऱ्हाड फेकली, जी त्याच्या जबड्यात लागली. शेजारी झोपलेल्या आजीने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि मुलगा पळून गेला. यानंतर त्याने त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची हत्या केली.
आठ जणांची हत्या करून गळफास
त्यानंतर मुलाने या घटनेची माहिती गावातील इतर लोकांना दिली. मात्र तोपर्यंत तरुणाने आठ जणांना ठार केले होते. यात आरोपीने त्याची पत्नी, आई, भाऊ, वहिनी, बहीण, पुतण्या, दोन भाची यांची हत्या केली आहे. गावकऱ्यांनी तत्काळ पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. त्यादरम्यान हल्लेखोराचा मृतदेह घरापासून काही अंतरावर झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
आरोपीचे नुकतेच झाले होते लग्न
दरम्यान, आरोपीचे लग्न 21 मे रोजीच झाले होते. आरोपीची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी त्याच्यावर होशंगाबाद येथे उपचार देखील करण्यात आले होते. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी घरात आठ मृतदेह पडले होते. तर आरोपीचा मृतदेह काही अंतरावर झाडाला लटकलेला आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.