आरोग्यजनरल नॉलेज

धक्कादायक ! माणसांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आढळली ‘ही’धोकादायक गोष्ट,पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या कमी?


माणसाच्या अस्तित्वाला धोका असल्याचं तुम्ही आत्तापर्यंत अनेकदा ऐकलं असेल. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात याबाबत एक भीतीदायक सत्य समोर आलं आहे. शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, पुरुषांच्या टेस्टिकल्स म्हणजेच प्रायव्हेट पार्टमध्ये मायक्रोप्लॅस्टिकचे कण पोहोचले आहेत.

यामुळे त्यांचं लैंगिक आरोग्य गंभीररित्या धोक्यात येऊ शकतं.

प्लॅस्टिकच्या पाच मिलिमीटरपेक्षा लहान तुकड्यांना मायक्रोप्लॅस्टिक म्हणतात. ते समुद्रात प्रवेश करतात आणि जलचर व माणसांच्या आरोग्यावर विपरित परिणाम करतात. आत्तापर्यंत अनेक गोष्टींमध्ये प्लॅस्टिकचे हे छोटे तुकडे सापडले होते. आता हे प्राणघातक कण पुरुषांच्या टेस्टिकल्समध्ये सापडले आहेत. चिंतेची बाब म्हणजे, या संशोधनासाठी जमा केलेल्या सर्व मानवी नमुन्यांमध्ये मायक्रोप्लॅस्टिकचे कण आढळले आहेत.

संशोधनात काय दिसलं?

‘द गार्डियन’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांनी भीती व्यक्त केली आहे की, जगभरातील पुरुषांच्या शुक्राणूंच्या संख्येत अनेक दशकांपासून घट होत आहे. टेस्टिकल्समध्ये सापडलेल्या मायक्रोप्लॅस्टिकचा याच्याशी थेट संबंध असू शकतो. या संशोधनात संशोधकांनी पुरुषांच्या टेस्टिकल्समधून 23 नमुने घेतले होते आणि श्वानांच्या टेस्टिकल्समधून 47 नमुने घेतले. त्यांना प्रत्येक नमुन्यात मायक्रोप्लॅस्टिकचे तुकडे सापडले आहेत. सध्या या संशोधनात पुरुषांच्या शुक्राणूंची कमी झालेली संख्या निश्चित करता आली नाही. पण, श्वानांच्या नमुन्यांमध्ये मायक्रोप्लॅस्टिक्समुळे शुक्राणूंची संख्या कमी झाल्याचं निश्चित झालं आहे. याच आधारे, मायक्रोप्लॅस्टिकमुळे पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आतापर्यंत अनेक संशोधनातून असं निदर्शनास आलं आहे की, कीटकनाशकांसारख्या रासायनिक प्रदूषकांमुळे पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या अनेक दशकांपासून कमी होत आहे. अलीकडच्या काळात मानवी रक्त, प्लेसेंटा आणि आईच्या दुधात देखील मायक्रोप्लॅस्टिक आढळलं आहे. सध्या मायक्रोप्लॅस्टिक्सचे आरोग्यावर होणारे परिणाम स्पष्ट झालेले नाहीत. मात्र, मायक्रोप्लॅस्टिक मानवी पेशींना हानी पोहोचवत असल्याचं प्रयोगशाळेत सिद्ध झालं आहे.

मायक्रोप्लॅस्टिक शरीरात गेले कसे?

जगभरात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक कचरा फेकला जातो. त्यातून निर्माण होणाऱ्या मायक्रोप्लॅस्टिकमुळे माउंट एव्हरेस्टपासून ते खोल महासागरांपर्यंत सर्व घटक प्रदूषित झाले आहेत. प्लॅस्टिकचे छोटे कण खाण्या-पिण्याद्वारे आणि श्वासाद्वारे आपल्या शरीरात प्रवेश करत आहेत. हे कण आरोग्याला गंभीर हानी पोहोचवू शकतात.

शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की, मायक्रोप्लॅस्टिकचे कण शरीरातील ऊतींमध्ये अडकतात. हवेतील प्रदूषणाच्या कणांप्रमाणेच प्लॅस्टिकमध्ये असलेली रसायनंदेखील आरोग्यास हानी पोहोचवू शकतात. संशोधनात असंही समोर आलं आहे की, ज्या लोकांच्या रक्तप्रवाहात मायक्रोप्लॅस्टिकचे कण आढळले आहेत, त्यांना स्ट्रोक, हार्ट अॅटॅक आणि अकाली मृत्यूचा जास्त धोका आहे.

अमेरिकेतील न्यू मेक्सिको युनिव्हर्सिटीतील प्रोफेसर शियांगझोंग यू म्हणतात की, मायक्रोप्लॅस्टिक रिप्रॉडक्टिव्ह सिस्टीममध्ये प्रवेश करू शकतात की नाही याबद्दल सुरुवातीला शंका होती. पण, संशोधनाचे निष्कर्ष समोर आल्यानंतर त्यांना धक्का बसला. संशोधकांचं म्हणणं आहे की, टेस्टिकल्समध्ये मायक्रोप्लॅस्टिक सापडणं ही तरुण पिढीसाठी चिंतेची बाब आहे. वातावरणात प्लॅस्टिकचं प्रमाण सातत्याने वाढत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button