महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा; हवामान खात्याने वर्तवला धडकी भरवणारा अंदाज
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसानं (Weather Update) धुमाकूळ घातला आहे. अवकाळी पावसामुळे फळबागा आणि पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात देखील हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 24 तासांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असे हवामान विभागानं म्हटलं आहे. दरम्यान नुसता पाऊसच पडणार नसून पावसासोबत वादळी वाऱ्याची शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाकडून महाराष्ट्रातील जळगाव, सातारा, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.