गेली तीन दिवस झाले प्यायला पाणी नाही. प्लीज पाणी मिळेल का ? आणि घडल काय?
सद्या पांगारे ता पुरंदर जिल्हा पुणे येथे पाण्याची समस्या अतिशय बिकट झाली आहे.
गावाच्या खालच्या बाजूला एक मोठे धरण आहे. या धरणासाठी पांगारे गावाची जमीन धारणा खाली गेली आहे. परंतू त्यातील पाणी ईतर सहा गावांत पुरवले जाते.
याशिवाय गावाच्या वरच्या बाजूला एक मोठे धरण आहे. या धरणातून बंद पाईपातून खालच्या धरणाच्या खालील गावांना पाणीपुरवठा करण्याचे काम गेली चार वर्षं अपूर्णावस्थेत आहे. दोन दोन धरणे असूनही स्थानिक राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे आज गावात प्यायला देखील पाणी नाही. गावातील सर्व विहीरी, बोअरवेल्स कोरड्या पडल्या आहेत.
देव कृपेने माझ्या भाऊ वाडा कृषी पर्यटन केंद्र येथील बोअरवेलचे पाणी अजून चालू आहे.
साधारण एक महिन्यापूर्वीची गोष्ट..
दलित वस्तीतील एक व्यक्ती पाण्यासाठी भाऊ वाड्यावर आली. भाऊ, गेली तीन दिवस झाले प्यायला पाणी नाही. प्लीज पाणी मिळेल का ? मी म्हटले हो हो. भांडी घेऊन या. हवे तेवढे पाणी घेऊन जा. थोड्यावेळाने त्याची बायको मुलं आणि एक लग्न झालेली मुलगी यांना घेऊन तो पाणी भरायला आला. त्याच्या बायकोचा एक हात प्लास्टरमध्ये होता. त्यांना म्हटलं हात फ्रॅक्चर आहे तर आराम करा ना. त्यावर तिने तिच्या मुलीकडे बोट दाखवून सांगितले ती गर्भवती आहे. आठवा महिना चालू आहे. हे ऐकून माझं मन हेलावून गेले. लगेच कामाला लागलो. संतोष धिवार मिस्त्री यांना बोलावले. पनीर प्लांटच्या बाजूला रस्त्याला लागून एक कट्टा बनवून घेतला. त्यावर एक पाण्याची टाकी बसवली. बाहेर एक नवीन नळ बसवला. चोवीस तास या टाकीमध्ये पाणी भरलेले राहील असा संकल्प केला आहे.
सद्या रोज साधारण ५ टॅंकर पाणी वितरीत होत आहे.
हे पाणी २०० फूट खोल बोअरवेलमधून येत असल्याने शुद्ध आहे.
हा उपक्रम संपूर्णतः सामाजिक हेतूने प्रेरित असल्यामुळे या ठिकाणी शाल श्रीफळ हार आदर सत्कार फोटो हस्ते शुभहस्ते अध्यक्ष प्रमुख पाहुणे ई. गोष्टींना थारा नसतो.
पांगारे गावातील सर्वांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन भाऊ वाडा कृषी पर्यटन केंद्राचे श्री. संदीप एकनाथ काकडे यांनी केले आहे.
गावाच्या घेरा मोठा असून गावाच्या पूर्वेला भाऊ वाडा आहे. पश्चिमेकडील महिला उन्हातान्हात डोक्यावर हंडे घेऊन भाऊ वाड्यावर येतात. पण ते अंतर खूप असल्याने खूप हाल होत आहेत. त्यामुळे २० तारखेपासून एक टेम्पो भाड्याने घेऊन त्यामध्ये पाण्याची टाकी भरून गावात घरोघरी जाऊन पाणी पोहोचवले जात आहे.
हे काम खूप जिकिरीचे आहे. २४ तास पाणी भरण्यासाठी विजेचे इंडस्ट्रीयल कनेक्शन घेतले आहे. त्यांचे भरमसाठ बिल येत आहे. टेम्पोचे भाडे खूप आहे. शिवाय पाणी भरताना नागरिकांची वादावादी होत आहे. कधी मोटर बिघडली, कधी पाईप फुटला तर कधी नळ तुटला.
याही परिस्थितीत कोणत्याही सरकारी अनुदान किंवा खाजगी मदतीशिवाय हा उपक्रम जिद्दीने चालू आहे.
भाऊ वाडा
संदीप एकनाथ काकडे
काळुबाई मंदिराजवळ. प्राथमिक शाळेमागे
पांगारे..
8805620700