क्राईमताज्या बातम्या

एकापाठोपाठ तीन शक्तीशाली स्फोट, स्फोट इतका मोठा की काही किलोमीटरपर्यंत धरती हादरली


डोंबिवली एमआयडीसीमध्ये अंबर नावाच्या कंपनीत मोठा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की, दोन किमीपर्यंतची धरती हादरली. कंपनीच्या काही किमी अंतरावरील इमारतींच्या अक्षरश: काचा फुटल्या.



तसेच रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांच्या देखील काचा फुटल्या. सर्वसामान्य नागरिकांच्या कानठळ्या बसतील असा हा स्फोट होता. कंपनीत बॉयलरच्या स्फोटामुळे ही दुर्घटना घडली. विशेष म्हणजे एकामागे एक असे तीन स्फोट झाल्याचा आवाज आला. या स्फोटांचा आवाज खूप मोठा होता. स्फोटानंतर कंपनीला भीषण आग लागली. या आगीत कंपनी जळून खाक झाल्याचं बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे ही आग वाढण्याची भीती आहे. आगीमुळे धुरांचे मोठमोठे लोट हवेत मिसळताना दिसत आहेत.

 

डोंबिवली एमआयडीसीतील कंपनीत अशाप्रकारे स्फोट होण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीदेखील अशीच घटना दोन वर्षांपूर्वी घडली होती. आता देखील तशाच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. अंबर कंपनीत झालेल्या स्फोटामुळे 15 मजूर जखमी झाले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. पण आग इतकी मोठी आहे की, आजूबाजूच्या कंपन्यांना देखील धोका निर्माण झालाय. स्फोट झालेल्या कंपनीच्या आजूबाजूलादेखील अनेक केमिकल कंपन्या आहेत. त्यामुळे धाकधूक वाढली आहे. प्रशासनाकडून सर्वातोपरी प्रयत्न सुरु आहेत.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “डोंबिवली एमआयडीसीमध्ये अंबर राज म्हणून एक कंपनी आहे, या कंपनीत बॉयलरचा स्फोट झालेला आहे. माझं जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झालं आहे. तिथे सर्व रेस्क्यू टीम पोहोतली आहे. तिथे जिल्हाधिकारी पोहोचत आहेत. खासदार श्रीकांत शिंदे पोहोचले आहेत. त्यामुळे तिथे सर्व कंट्रोलमध्ये आहे. सुदैवाने कॅजवलिटी बहुतेक नाहीय. तिथे रेस्क्यू टीम पोहोचलेली आहे”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

8 जण या घटनेत अडकले, फडणवीसांची माहिती

या घटनेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेसबुकवर प्रतिक्रिया दिली. “डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना दु:खद आहे. 8 जण या घटनेत अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. जखमींच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून आणखी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकार्‍यांशी माझी चर्चा झाली असून, तेही 10 मिनिटांत घटनास्थळी पोहोचत आहेत. एनडीआरएफ, टीडीआरएफ, अग्नीशमन दलाच्या चमू पाचारण करण्यात आल्या आहेत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, रविंद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया

भाजप नेते रविंद्र चव्हाण यांनी घटनेनंतर प्रतिक्रिया दिली. “डोंबिवली एमआयडीसी फेज-2 मध्ये केमिकल कंपनीत झालेला स्फोट ही अतिशय गंभीर बाब आहे. या स्फोटात जखमी झालेल्या रुग्णांवर होणाऱ्या उपचारांना यश यावे, अशी प्रार्थना. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. तरीही आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी कृपया घाबरु नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, हे आवाहन”, अशी प्रतिक्रिया रविंद्र चव्हाण यांनी दिली.

 

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button