जनरल नॉलेज

३० वर्षांपूर्वीच झालं दोघांचही निधन, तरीही आज होतंय लग्न; काय आहे भारतातील भूतविवाहाची प्राचीन परंपरा ?


लग्नात नवरदेव मृत होता आणि वधूही! चक्क ३० वर्षांपूर्वीच या दोघांचाही मृत्यू झाला होता आणि तरीही आज त्याचं लग्न आहे!” अशा आशयाची ‘एक्स’ वरील पोस्ट व्हायरल होत आहे. मुळात ही पोस्ट २०२२ मधली आहे. तरीही त्यातील संदर्भ आणि विषय यामुळे आजही हा विषय चर्चेचा ठरत आहे. त्याच अनुषंगाने मृत्यूनंतर होणाऱ्या या विवाह सोहळ्याच्या प्रथा- परंपरेविषयी जाणून घेणे रंजक ठरावे.

भूत विवाह म्हणजे काय?

भूतविवाह हा इंग्रजीत Ghost marriage किंवा Posthumous marriage म्हणून ओळखला जातो. भारतात भूतविवाह प्रामुख्याने कर्नाटक आणि केरळ प्रांतात प्रचलित आहे. या भागात हा विवाह प्रेथ मादुवे, प्रेत विवाह अशा इतर काही नावांनी प्रसिद्ध आहे. इतर कुठल्याही दक्षिण भारतीय विवाहाप्रमाणेच हा विवाह सोहळा असतो. किंबहुना तितकाच पवित्र सोहळा मानला जातो. या सोहळ्यात वधूचा वराकडून आलेल्या पारंपारिक अलंकार, साडी इत्यादीने शृंगार केला जातो. नवरदेव पांढरा मुंडू परिधान करतो. विवाहापूर्वी वधू- वरांच्या कुंडलीचे मिलन केले जाते. त्यांच्या कुटुंबियांची मान्यता मिळाल्यानंतरच शुभ मुहूर्तावर लग्न लागते. हा सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मोठ्या पंगती बसतात. एकूणच वधू-वर मृत आहेत या खेरीज इतर सामान्य विवाहाप्रमाणेच हा सोहळा असतो.

विवाह नक्की कोणाचा होतो?

वय वर्ष १८ पूर्ण होण्यापूर्वीच बालपणातच किंवा किशोरवयात मृत झालेल्या मुला- मुलींचा विवाह त्यांच्या तारुण्यात लावण्यात येतो, यालाच भूत विवाह म्हणतात. लाकूड किंवा इतर साहित्यापासून वधू- वराच्या प्रतिमा तयार करण्यात येतात. स्थानिक मान्यतेनुसार हा विवाह मृतांचा सन्मान करण्याचा मार्ग आहे. ही प्रथा नेमकी कधी सुरू झाली याविषयी निश्चित काही सांगता येत नाही. या स्वरूपाच्या विवाहांना कायदेशीर मान्यता नाही.

या प्रथेमागील तर्क आणि परंपरा!

“विवाहाशिवाय जीवन अपूर्ण आहे” आणि अविवाहित कुटुंबातील सदस्याचा आत्मा ‘मोक्षा’शिवाय कायमचा भटकू शकतो या समजुतीतून ही परंपरा निर्माण झाली असावी, असे मानववंशशास्त्रज्ञ मानतात. ही प्रथा असणाऱ्या समुदायातील लोकांच्या मान्यतेनुसार त्यांच्या मुलांपैकी १८ वर्षांच्या आधी कोणाचा मृत्यू झाला तर त्यांचे आत्मे शांतीच्या शोधात भटकत राहतात.

यामुळे, मृत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांसाठी, विशेषत: मृताच्या भावंडांसाठी हे चांगले मानले जात नाही. अशा परिस्थितीत, कुटुंब ज्योतिषाच्या सल्ल्यानुसार मृत झालेल्या व्यक्तीला मोक्ष मिळवून देण्याकरिता हा विवाह सोहळा केला जातो.

विवाहाची तयारी

भूत विवाहाची सुरुवात मृत व्यक्तीसाठी योग्य वधू किंवा वर शोधण्यापासून होते. ज्योतिषी तरुणांच्या जन्म कुंडलीचे मिलन करतो आणि दोन्ही कुटुंबे सहमत असतील तरच विवाहसोहळा पार पाडला जातो. लग्न होण्यासाठी वर वधूपेक्षा किमान दोन वर्षांनी मोठा असावा, अशी अट असते. लग्न सोहळा रात्री करण्यात येतो, मुख्यतः लग्नासाठी अमावस्या हा दिवस मुहूर्त म्हणून निवडला जातो. वराचे कुटुंब लग्नाच्या दिवशी वधूच्या घरी भेटवस्तू घेऊन येतात. मृत जोडप्याचे प्रतिनिधित्व लाकूड आणि गवतापासून तयार केलेल्या बाहुल्यांद्वारे केले जाते आणि त्यांचा विवाह झाडाखाली लावण्यात येतो. मंत्रांचे पठण केले जाते, पुष्पमालांची देवाणघेवाण केली जाते आणि वधूच्या कपाळावर कुंकू लावले जाते.

सप्तपदी, कन्यादान आणि मंगळसूत्र विधी केले जातात. वधूचा भाऊ पुतळे हातात घेऊन लग्नमंडपात फेरे घेतो.

लग्नाची सांगता नातेवाईक आणि पाहुण्यांना केळीच्या पानावर दिल्या जाणाऱ्या जेवणाने होते. या मेजवानीत कर्नाटकात सामान्य लग्नात मिळणाऱ्या लोकप्रिय पदार्थांचा समावेश असतो. मृत जोडप्याच्या जेवणासाठी (इडियप्पम) इडली, चिकन करी, चिकन सुक्का, कडले बल्यार, मटण ग्रेव्ही, फिश फ्राय आणि वाफवलेला भात यासह अनेक पदार्थ तयार केले जातात. मेजवानी आणि पाहुणे निघून गेल्यानंतर, वराचे कुटुंब वधू- वरच्या पुतळ्यासह वरात घेवून निघतात. रात्री नवविवाहित जोडप्याच्या प्रतिमा सप्तपर्णीच्या झाडाखाली ठेवल्या जातात किंवा पाण्यात विसर्जित केल्या जातात. काही कुटुंबे विधी पूर्ण करून एकत्रितपणे पुतळ्यांचे दहन करण्याचा निर्णय घेतात. सध्या जलद शहरीकरणाच्या कालखंडात ही प्रथा नामशेष होत चालली आहे.

जगभरातील भूत विवाह

भूत विवाह ही संकल्पना भारतासाठी वेगळी नाही. किंबहुना चीन, सुदान आणि फ्रान्समध्ये अशा पद्धतीच्या विवाहाची प्रथा आहे. फक्त प्रांतपरत्त्वे या विवाहांच्या पद्धतींमध्ये फरक आढळून येतो. गेल्या ३००० वर्षांपासून चीनमध्ये ‘भूत विवाह’ करण्याची परंपरा आहे. काही वेळा जिवंत व्यक्ती प्रेताशी विवाह करतात. शांक्सी ग्रामीण भागात मरणोत्तर विवाह ही एक प्राचीन प्रथा आहे. चीनमध्येही अशा प्रकारच्या विवाहांपूर्वी ज्योतिषाचा सल्ला घेतला जातो. अविवाहित मुलगा मरण पावल्यावर कुटुंबाला शाप मिळेल, अशी धारणा स्थानिक पातळीवर आहे. परिणामी, मुलगा गमावणारे पालक ‘भूत- सून’ शोधण्यासाठी वारंवार प्रयत्न करतात. चिनी कम्युनिस्ट सरकारने १९४९ साली ही प्रथा बेकायदेशीर ठरवली, परंतु ती अद्यापही चीनमधील दुर्गम खेड्यांमध्ये प्रचलित आहे. यासंबंधी विवाहसंस्थाही चीनमधील खेड्यापाड्यात आहेत. याच विषयावर आधारित The Ghost Bride (२०२०) हीसिरीज देखील नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली होती.

फ्रान्समध्ये, जिवंत आणि मृत लोकांमधील मरणोत्तर विवाह कायदेशीर आहेत. मात्र त्यासाठी कठोर कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागते.

सुदानमध्ये अशी परंपरा आहे की, जेव्हा एखाद्या लग्न जमलेल्या माणसाचा मृत्यू होतो तेव्हा त्याचा भाऊ त्याच्या लग्नात त्याची जागा घेतो आणि त्याच्या कोणत्याही मुलास मृत भावाची मुले मानली जातात. जगभरात कमी- अधिक फरकाने अशा पद्धतीचे विवाह प्रचलित आहेत. यामागे मृत्यू, मृत्यूनंतरचे जग, मृत्यूची भीती प्रामुख्याने कारणीभूत असल्याचे मानववंशशास्त्रज्ञांचे निरीक्षण आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button