बाओबाब वृक्ष एक रहस्यच ! वृक्षांच्या अनेक गोष्टी आजही रहस्यमयच…
सिडनी : पृथ्वीवर अशी काही ठिकाणे आणि वृक्षही आहेत ज्यांना पाहिल्यावर ते या पृथ्वीतलाचे असावेत, असे वाटत नाही. त्यामध्येच बाओबाब वृक्षांचा समावेश होतो. अत्यंत अनोख्या रंगरूपाचे व वैशिष्ट्यांचे हे वृक्ष मादागास्कर बेटावर विकसित झाले आणि हळूहळू आफ्रिका व ऑस्ट्रेलियातही पसरले, असे आता एका नव्या संशोधनातून दिसून आले आहे; मात्र या वृक्षांच्या अनेक गोष्टी आजही रहस्यमयच आहेत.
हे वृक्ष मादागास्करमधून ऑस्ट्रेलियामध्ये कसे पोहोचले हे एक कोडेच आहे. हे वृक्ष तब्बल 82 फूट उंच होऊ शकतात. तसेच ते हजारो वर्षे जगू शकतात हे विशेष! या वृक्षांना ‘द ट्री ऑफ लाईफ’ म्हणजेच ‘जीवनवृक्ष’ असेही संबोधले जाते. याचे कारण म्हणजे पाणी साठवून ठेवण्याची त्यांची अफलातून क्षमता. हे वृक्ष त्यांच्या पानांच्या माध्यमातून अन्न व औषधही देतात. ‘अॅडानसोनिया’ असे या वृक्षांचे वैज्ञानिक नाव आहे.
‘अॅडानसोनिया डिजिटाटा’ ही त्यांची एक प्रजाती 32 आफ्रिकन देशांमध्ये आढळते. तसेच ए. ग्रेगरी ही प्रजाती वायव्य ऑस्ट्रेलियात आढळते. अन्य सहा प्रजाती या मादागास्कर बेटावर आढळतात. संशोधकांनी त्यांच्या विकासाचे किंवा उत्क्रांतीचे रहस्य समजून घेण्यासाठी या सर्व प्रजातींच्या जीनोमचा अभ्यास केला. त्यावरून त्यांना असे दिसून आले की मुळात हे वृक्ष 41.1 दशलक्ष वर्षांपूर्वी मादागास्कर बेटावरच उदयास आले. 21 दशलक्ष वर्षांपूर्वी या मूळ वृक्षांपासून पहिला बाओबाब वृक्ष विकसित झाला. याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘नेचर’ या नियतकालिकात देण्यात आली आहे.