“मी भारतातील १३०० बेटांचा शोध लावला, काही बेटं सिंगापूरपेक्षाही मोठी”; पंतप्रधान मोदींचं विधान चर्चेत
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरू आहे. या निवडणुकीच्या प्रचारात अनेक मुद्दे चर्चेत आले. यामध्ये काही दिवसांपूर्वी भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या कच्चथिवू बेटाचा मुद्दा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला.
भारतात लोकसभा निवडणुकांचं वातावरण तापलेलं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सभेत बोलताना कच्चथिवू बेटावरून काँग्रेसवर केलेल्या आरोपांची चर्चा रंगली होती. याच अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी गुजरातमधील जुनागढ येथे एका सार्वजनिक सभेला संबोधित करताना केलेलं एक वक्तव्य आता चर्चेत आलं आहे. “मी भारतातील १३०० बेटांचा शोध लावला असून त्यातील काही बेट सिंगापूरपेक्षाही मोठी आहेत”, असं विधान पंतप्रधान मोदी यांनी केलं होतं.
पंतप्रधान मोदी यांनी काय म्हटलं?
“देशात काँग्रेसचे सरकार असताना भारतातील बेटांच्या संख्येबाबत सरकारकडे कोणतीही अचूक माहिती नव्हती. मात्र, मी पंतप्रधान झाल्यानंतर सरकारने उपग्रह सर्वेक्षण केले. त्यानंतर आपल्या भारताच्या समुद्र किनाऱ्यांच्या आसपास १३०० पेक्षा जास्त बेटे आहेत हा शोध लावला. त्यापैकी काही सिंगापूर पेक्षाही मोठे आहेत. यानंतर मी हा निर्णय घेतला की त्यापैकी काही निवडक बेटे पर्यटनासाठी विकसित करण्यात येणार आहेत. लोक पर्यटनासाठी बाहेर जाणार नाहीत. पर्यटनासाठी बाहेर देशातील पर्यटक आपल्या देशात येतील”, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं होतं.
मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
पंतप्रधान मोदी यांनी या मुद्यांवर बोलताना काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. ते म्हणाले होते की, “असे अनेक बेटे आहेत तेथे कोणीही राहत नाही. मात्र, काँग्रेसची सत्ता असती तर काँग्रेसने अशा बेटांचा सौदा केला असता. त्यामुळे काँग्रेसच्या विचारधारेपासून सावध राहिलं पाहिजे. काँग्रेस जो पर्यंत सत्तेत राहिली तो पर्यंत देशाच्या सुरक्षेला डावावर लावण्याच काम काँग्रेसनं केलं”, असा हल्लाबोल पंतप्रधान मोदी यांनी केला.
कच्चथिवू बेट कुठे आहे?
कच्चथिवू बेट हे भारत आणि श्रीलंकेच्यामध्ये असणार्या पाल्क क्षेत्रात आहे. हे २८५ एकरचे निर्मनुष्य बेट आहे. बेटाची लांबी केवळ १.६ किमी आहे. कच्चथिवू बेट रामेश्वरमच्या ईशान्येस भारतीय किनारपट्टीपासून जवळ जवळ ३३ किमी अंतरावर आहे. तसेच ते श्रीलंकेच्या उत्तरेकडे असणार्या जाफनापासून ६२ किमी अंतरावर आणि श्रीलंकेच्या लोकवस्ती असलेल्या डेल्फ्ट बेटापासून २४ किमी अंतरावर आहे.