जवानांनी 80 हजार महिलांना पाशवी बलात्कार करून संपवलं, जगाला हादरवणारी भयंकर घटना
प्रत्येक देशाच्या इतिहासात काही गौरवाचे, अभिमानाचे क्षण असतात. त्याचबरोबर काही कटू आठवणीही असतात. भारतात इंग्रजांच्या राजवटीत जालियनवाला बाग हत्याकांड घडलं. जगातल्या इतर काही देशांमध्येही अशी काही भीषण हत्याकांडं घडलेली आहेत.
दुसऱ्या चीन-जपान युद्धानंतर जपानी सैनिकांनी चीनच्या नानजिंग शहरातल्या हजारो नागरिकांची व सैनिकांची हत्या केली, तसंच हजारो स्त्रियांचं शोषण केलं. त्या भयानक घटनेतून सावरण्यासाठी नानजिंगवासीयांना अनेक दशकं लागली.
चीनच्या इतिहासात नानजिंग हत्याकांड किंवा नानजिंगचा बलात्कार ही अतिशय रक्तरंजित व भीषण घटना म्हणून ओळखली जाते. 1937च्या उत्तरार्धात जपानी सैन्यानं चीनच्या नानजिंग शहरावर हल्ला करून तिथल्या हजारो नागरिकांची व सैनिकांची हत्या केली. तसंच हजारो मुलींवर आणि स्त्रियांवर बलात्कारही केले. नानजिंग ही त्या काळी चीनची राजधानी होती. दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या सुरुवातीच्या काळात जपाननं चीनची राजधानी नानजिंगकडे आपला मोर्चा वळवला होता. दुसऱ्या चीन-जपान युद्धात शांघायमध्ये मिळवलेल्या रक्तरंजित विजयानंतरचा हा कालखंड होता.
आपलं लष्कर गमावण्याच्या भीतीनं चीनचे राष्ट्रवादी नेते चियांग कई-शेक यांनी नानजिंग शहरातून जवळपास सगळं चिनी सैन्य माघारी बोलावण्याचे आदेश दिले. त्यामुळे त्या शहरात अप्रशिक्षित सैन्य शिल्लक राहिलं. कोणत्याही किमतीत ते शहर ताब्यात घेण्याच्या सूचना चियांग यांनी दिल्या; मात्र नागरिकांना अधिकृतपणे बाहेर काढण्यास मनाई केली. अनेकांनी या आदेशाकडे दुर्लक्ष केलं व पळून गेले. इतरांना मात्र शत्रूच्या दयेवर सोडून देण्यात आलं.
आंतरराष्ट्रीय समितीतल्या पाश्चिमात्य व्यावसायिकांच्या व मिशनरीजच्या एका छोट्या गटानं नानजिंग सेफ्टी झोन तयार करण्याचा प्रयत्न केला. शहरातल्या नागरिकांना आश्रय देणारं हे छोटंसं ठिकाण होतं. नोव्हेंबर 1937 मध्ये हा सेफ्टी झोन खुला झाला. आकारानं न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कइतकाच तो होता. निर्वासितांच्या डझनभर छावण्या त्यात होत्या. एक डिसेंबरला चिनी सरकारनं नानजिंगवर बहिष्कार टाकला. आंतरराष्ट्रीय समितीला त्यातून वगळण्यात आलं. इतर सर्व नागरिकांनी त्यांच्या त्यांच्या सेफ्टी झोनमध्ये जावं असे आदेश देण्यात आले,’हिस्ट्री डॉट कॉम’ने त्याबाबतचं वृत्त दिलं आहे.
भीषण संहार
जनरल मात्सुई इवान यांच्या नेतृत्वाखाली जपानच्या सेंट्रल चायना फ्रंट आर्मीची पहिली तुकडी डिसेंबर 13 रोजी शहरात दाखल झाली. ते दाखल होण्याआधीच जपानी सैन्यानं चीनमधून जाताना केलेल्या संहाराबद्दल लोकांमध्ये चर्चा होऊ लागली. चिनी सैन्याला शोधून शोधून मारण्यात आलं. शांघायच्या लढाईत अनेक आठवडले थकलेलं, भुकेलं, बेशिस्त जपानी सैन्य त्यांच्या मारल्या गेलेल्या सहकाऱ्यांमुळे उद्विग्न झालं होतं. मनात राग धुमसत होता. आधीच्या लढाईचा बदला घेण्याचं त्यांच्या डोक्यात होतं.
त्याची परिणती भयंकर संहारात झाली. संपूर्ण कुटुंबांच्या हत्या करण्यात आल्या. वृद्ध आणि लहान मुलांना लक्ष्य करण्यात आलं. हजारो महिलांचं शारीरिक शोषण करण्यात आलं. त्या हल्ल्यानंतर अनेक महिने रस्त्यांवर मृतदेह पडून होते. नानजिंगमधल्या एक तृतीयांश इमारतींना जपानी सैन्यानं उद्ध्वस्त केलं व लुटलं.
अनेक प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार व हत्याकांडानंतर केलेल्या विश्लेषणानुसार, 20 ते 80 हजार महिलांवर त्या वेळी बलात्कार करण्यात आला. तसंच तरुण मुली व प्रौढ स्त्रियांची छळवणूक करण्यात आली. त्यापैकी व सामूहिक बलात्कारातल्या अनेकींची नंतर हत्या करण्यात आली. सुरुवातीला नानजिंग सेफ्टी झोनपासून लांब राहू असं जपाननं सांगितलं असलं तरी ते नागरिकदेखील सुरक्षित नव्हतेच. जानेवारी 1938मध्ये शहरात सुव्यवस्था प्रस्थापित झाल्याचं जपाननं सांगितलं. त्यामुळे सेफ्टी झोन बरखास्त करण्यात आला. प्रत्यक्षात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हत्या सुरूच होत्या. दुसरं महायुद्ध संपेपर्यंत नानजिंगमध्ये नामधारी सरकार स्थापन करण्यात आलं.
हत्याकांडानंतरची परिस्थिती
नानजिंग हत्याकांडातील मृतांचा अधिकृत आकडा उपलब्ध नाही; मात्र अंदाजे दोन ते तीन लाख लोकांचा बळी यात गेला असावा. दुसरं महायुद्ध संपल्यानंतर लगेचच मात्सुई आणि लेफ्टनंट तानी हिसाओ यांना त्या संहाराबाबत दोषी ठरवून इंटरनॅशनल मिलिटरी ट्रिब्यूननं मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. त्याची अंमलबजावणीही तत्काळ करण्यात आली.
नानजिंगच्या या हत्याकांडामुळे चीन व जपानमधील संबंध आजही ताणलेलेच आहेत. त्या हत्याकांडाचं खरं स्वरूप कसं होतं, याबाबत वाद आहेत. अनेक ऐतिहासिक सुधारणावादी, जपानी राष्ट्रवादी यांनी प्रचाराच्या हेतूने हत्याकांडाचं खरं स्वरूप बदलून लोकांपुढे आणलं. हत्याकांडातल्या मृतांचा आकडा फुगवून सांगितला आहे असा काहींचा दावा आहे, तर काही जण असं काही घडलं होतं हेच नाकारतात.
आता नानजिंग हत्याकांडं मेमोरियल हॉलमध्ये या हत्याकांडातल्या पीडितांचं स्मरण केलं जातं. नानजिंगमधील ‘दहा हजार मृतदेहांचा खड्डा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सामूहिक कबरींजवळ हा हॉल आहे. युनेस्कोनं नानजिंग हत्याकांडाची ऐतिहासिक कागदपत्रं त्यांच्या ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर’मध्ये समाविष्ट केली आहेत.
एके काळी चीनची राजधानी असलेलं नानजिंग हे शहर जपानी सैन्यानं केलेल्या हल्ल्यामुळे उद्ध्वस्त झालं. ते पूर्ववत होण्यास अनेक दशकांचा कालावधी गेला. त्यानंतर चीनची राजधानी बीजिंग झाली व नानजिंग हे औद्योगिक शहर म्हणून विकसित झालं. चीनच्या इतिहासातील नानजिंगचं हत्याकांड हे अतिशय रक्तरंजित पान आहे.