कार अपघातात सहा ठार; मृतकांमध्ये आमदार सरनाईक यांच्या कुटुंबातील तिघांचा समावेश
कारवरील नियंत्रण सुटल्याने दोन कार समोरासमोर धडकल्या. अपघाताची भीषणता एवढी होती की, कारमधील सहा जण ठार तर तिघे गंभीर जखमी झाले. मृतकांमध्ये अमरावती शिक्षक मतदार संघाचे आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील तिघांचा समावेश आहे.
तर अन्य दोघे अकोला जिल्हयातील पास्टूल येथील रहिवाशी आहेत.
पातूर येथील उड्डाण पुलाजवळ शिगर नाल्याजवळ हा अपघात घडला असून जखमींवर अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत.
पोलिस सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, आमदार किरण सरनाईक यांचे बंधू अरुण सरनाईक यांचा मुलगा रघुवीर सरनाईक, शिवानी सरनाईक, अस्मिता आमले हे वाशीमवरून अकोलाकडे कारने येत होते. दरम्यान त्यांच्या कारला समोरून येणाऱ्या दुसऱ्या कारने जबर धडक दिली. यामध्ये दोन्ही कारचा चुराडा झाला.
अपघातात रघुवीर अरुणराव सरनाईक (२८) वाशिम, शिवानी अजिंक्य आमले (३०) नागपूर, अस्मिता अजिंक्य आमले (०९ महिने) नागपूर व आस्टूल रहिवासी अमोल शंकर ठाकरे (३५) रा. पास्टूल, सुमेध इंगळे रा. पास्टूल, सिद्धार्थ यशवंत इंगळे (३५) रा. पास्टूल हे सहा जण या अपघातात ठार झाले. तर पियुष देशमुख, सपना देशमुख, श्रेयस सिद्धार्थ इंगळे हे गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर अकोला येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत.
पोलिसांसह नागरिकांची धाव
दरम्यान घटनास्थळी पातुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके यांना अपघाताची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. अपघातानंतर रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी अपघाती वाहन रस्त्याच्या बाजूला करत वाहतुकीचा मार्ग मोकळा करून दिला तर जखमींना तातडीने अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी भरती केले.
अपघातास रस्ता कारणीभूत
चारपदरी असलेल्या अकोला वाशिम मार्गावर काही ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे, त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक एकाच रस्त्यावर वळविण्यात आली होती. त्यामुळेच ही दोन्ही वाहने एकाच रस्त्यावर आल्याने समोरासमोर धडकून अपघात झाला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.