Paksitan: पाकिस्तानात का झाली 19 जणांची हत्या? समोर आला भयंकर प्रकार
कराचीमध्ये गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे, दरोड्याच्या प्रतिकार करताना तब्बल 19 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 55 जण जखमी झाले आहेत, अशी बातमी ARY न्यूजने दिली आहे.
एका पोलिस अधिकाऱ्याने असा खुलासा केला की, दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या सशस्त्र दरोडेखोरांमुळे कराचीमध्ये 19 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
या वर्षी, शहरात दरोडा-संबंधित मृत्यूंमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, त्याची संख्या आता 59 पर्यंत पोहचली आहे. त्या तुलनेत, मागील वर्षीच्या याच कालावधीत दरोड्यांविरुद्ध प्रतिकार केल्यामुळे 25 मृत्यू आणि 110 जण जखमी झाले होते. 2023 मध्ये, अशाच गुन्ह्यांमध्ये 108 मृत्यू आणि 469 जण जखमी झाले होते.
कराची पोलिसांची यावर्षी दरोडेखोरांसोबत 425 वेळा चकमक झाली. परिणामी 55 दरोडेखोर यामध्ये ठार झाले. तर 439 दरोडेखोर जखमी झाले आहेत.
नागरिक-पोलीस संपर्क समितीच्या अहवालानुसार, 2024 च्या पहिल्या तीन महिन्यांत दरोड्याचे 22,627 गुन्हे नोंदवले गेले, ज्याचा प्रतिकार करताना 59 जणांचा मृत्यू झाला असून, 700 हून अधिकजण जखमी झाले आहेत.
याव्यतिरिक्त, या कालावधीत 373 कार, 15,968 मोटारसायकल आणि 6,102 मोबाईल फोन चोरीला गेल्याची किंवा हिसकावण्यात आल्याची नोंद आहे.
कराचीचे पोलीस प्रमुख, अतिरिक्त महानिरीक्षक इम्रान याकूब यांनी कराचीतील गुन्ह्यांमध्ये बाहेरील गुन्हेगारांची संख्या अधिक असल्याचे सांगितले. यामध्ये सिंध आणि बलुचिस्तानमधील गुन्हेगारांचा सर्वाधिक समावेश आहे, असे ते पुढे म्हणाले.
यावेळी कराचीच्या पोलीस प्रमुखांनी सांगितले की, शहरातील दैनंदिन गुन्ह्यांचा दर दररोज 166 प्रकरणांचा आहे, पाकिस्तानमधील इतर मोठ्या शहरांच्या तुलनेने हा आकडा कमी आहे.
8 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत सिंधचे मुख्यमंत्री सय्यद मुराद अली शाह यांच्या उपस्थीतीत झालेल्या बैठकीचा, याकूब यांनी पुनरुच्चार करत सांगितले की, कराचीचा गुन्हेगारी दर तुलनेने माफक आहे, बाह्य गुन्हेगारी घटकांकडून आव्हाने असूनही, प्रत्येक पोलिस ठाण्यात सरासरी एकापेक्षा कमी प्रकरण होते.