तुम्हाला माहिती आहे का ! तुमच्या घरात आहेत पाकिस्तानच्या या वस्तू; एक ना दोन कितीतरी
भारत-पाकिस्तान या देशांतले व्यावहारिक, राजकीय संबंध कितीही तणावाचे असले भारतात अशा अनेक वस्तू आहेत, ज्या पाकिस्तानातून येतात. त्यांचा वापर दैनंदिन आयुष्यात केला जातो; पण आपल्याला मात्र या गोष्टीचा पत्ताच नसतो, घरात शोभेसाठी आणलेली एखादी वस्तू नेमकी कुठून आली आहे.
याविषयी अधिक जाणून घेऊ या.
अंगात घातलेला लोकरीचा स्वेटर, पानात वाढलेला आमरस किंवा जखमेवर लावलेला कापूस हा कुठल्या भूमीतून आपल्यापर्यंत आलेला असेल याचा बारकाईने विचार कधीच कोणीच करत नाही. या सगळ्याचं उत्पादन आपल्या देशातसुद्धा होतच असतं; मात्र आपल्या शेजारी देशातूनही या वस्तू आपल्या बाजारपेठेत येतात आणि आपण त्या सहज विकत घेत असतो.
पाकिस्तानातून भारतात येतात हे खाद्यपदार्थ
आपल्या आयुष्यात अशा अनेक सवयीच्या आणि खास गोष्टी आहेत, ज्या पाकिस्तानातून भारतात आलेल्या आहेत. दैनंदिन आयुष्यात अशा गोष्टी आपण अगदी सहज वापरत असतो. या वस्तूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे आंबा. होय! भारतात चवीनं खाल्ले जाणारे दशहरी आणि सिंधोरी जातीचे आंबे पाकिस्तानातूनच मागवले जातात. याशिवाय जे खजूर आणि पेरू आपण खूप आवडीनं आणि चवीनं खातो, त्यांची निर्यातही पाकिस्तानकडून केली जाते.
पाकिस्तानातून येतात या वस्तू
याखेरीज आपल्या चेहऱ्याचं सौंदर्य वाढवण्यासाठी आपण ज्या मुलतानी मातीचा वपर करतो, तीसुद्धा पाकिस्तानातून येते. तुम्हाला वाचून नक्कीच आश्चर्य वाटेल, की भारतात पूर्वापार स्वयंपाकाच्या काही पदार्थांत सैंधव मीठ वापरण्याची सवय आहे. ते सैंधव मीठसुद्धा पाकिस्तानातूनच येतं.
खरं तर पूर्ण आशियामध्ये सैंधव मीठ फक्त पाकिस्तानातच मिळतं. तसंच आरोग्य आणि बुद्धीवाढीसाठी किंवा स्मरणशक्तीसाठी खाल्ले जाणारे बदामसुद्धा पाकिस्तानातूनच येतात. अक्रोड आणि काही सुका मेवासुद्धा पाकिस्तानातून निर्यात केला जातो. तसंच काही प्रकारच्या तेलाच्या बिया आणि फळंसुद्धा पाकिस्तानातून येतात.
लोकरही येतं पाकिस्तानातून
भारतात ज्या लोकरीपासून विणलेले सुंदर स्वेटर आपण हौसेनं घालतो ती लोकरसुद्धा पाकिस्तानातून येते. आपण वापरत असलेला कापूससुद्धा पाकिस्तानातूनच येतो. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आणि दैनंदिन वापरातल्या वस्तू आहेत ज्या पाकिस्तानातून भारतात येत असतात; पण आपल्याला त्याबद्दल माहिती नसते, की वापरात असलेली एखादी वस्तू नेमकी कोठून येते.