ताज्या बातम्यामहाराष्ट्र

अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी पेट्रोल ओतून आत्मदहनाचा तरुणांचा प्रयत्न


जळगाव: भडगाव तालुक्यातील कजगाव येथील बसस्थानक परिसरातील अतिक्रमण काढावे, या मागणीसाठी तक्रारदार चार तरुणांनी मंगळवारी दुपारी पाचोरा येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला. दरम्यान, यातील एकाने चार वेळा असा आत्मदहनाचा प्रयत्न केला होता.



भडगाव तालुक्यातील कजगाव बसस्थानक परिसर अतिक्रमणाच्या विळख्यात आहे. तेथील अतिक्रमण काढण्याबाबत तक्रारदार भूषण पाटील, स्वप्नील पाटील, चेतन पाटील व जीवन चव्हाण (सर्व रा. कजगाव, ता. भडगाव) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासह भडगाव तहसील कार्यालय, पंचायत समिती, जिल्हा परिषद प्रशासनाकडे निवेदनांसह तक्रार अर्ज केले आहेत. अतिक्रमण काढण्याबाबत प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. या संदर्भात यापूर्वी या तरुणांपैकी एकाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळीही खोटी आश्‍वासने देत अतिक्रमण काढण्यात टाळाटाळ केली जात आहे.

जळगाव-मनमाड या राष्ट्रीय महामार्गावरील कजगावची लोकसंख्या सुमारे २० हजारांपर्यंत असून, गावात केळीची मोठी बाजारपेठ व रेल्वेस्थानक असल्याने, २५ खेड्यांतील ग्रामस्थांचा संपर्क आहे. बसस्थानक परिसर अतिक्रमणांनी वेढले गेले आहे. त्यामुळे प्रवाशांसह वाहतुकीस मोठी अडचण निर्माण होत आहे. शिवाय, अतिक्रमणांमुळे बसही थांबत नसल्यामुळे प्रवाशांना थेट महामार्गावर थांबावे लागते. त्यामुळे बसस्थानक परिसरातील अतिक्रमण काढावे, अशी मागणी निवेदनांद्वारे वारंवार केली. मात्र, प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली जात नाही. अखेर या चारही तरुणांनी मंगळवारी (२३ मे) दुपारी एकच्या सुमारास पाचोरा येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस प्रशासनासह अग्निशमन विभागाच्या कर्मचार्‍यांच्या सतर्कतेने त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न हाणून पाडला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button