मराठा समाजाचा आक्रोश हा 100टक्के खरा – पंकजा मुंडे
बीड: आज बीड जिल्ह्याचे वातावरण खूप गढूळ झाले आहे. जाती पातीमध्ये सध्या युवकांना भरकटवण्याचे काम केले जात आहे. या भरकटणाऱ्या युवकांना आपलेसे करण्याचे काम आपण सर्वांनी करण्याची आवश्यकता आहे असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना पंकजा मुंडें म्हणाल्या की, मनोज जरागे यांचे आंदोलन सुरू आहे मी त्यांच्या समर्थनात आहे. मराठा समाजाचा आक्रोश हा 100टक्के खरा तर मराठा समजला आरक्षण हे टिकणारे मिळण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया असे ही पंकजा म्हणाल्या.
मला हे तिकीट राज्याने दिले नाही. मला ही जबाबदारी मोदींनी दिली आहे. राज्याने नाही तर ही जबाबदारी देशाने दिली आहे असे पंकजा मुंडें म्हणाल्या. त्या बीड जिल्ह्याच्या धामणगाव या ठिकाणी सत्कार समारंभ कार्यक्रम प्रसंगी बोलत होत्या.
बीड लोकसभा उमेदवारी मिळाल्या नंतर भाजपा नेत्या पंकजा मुंडे या पहिल्यांदाच बीड जिल्ह्यात आल्या होत्या. बीड जिल्ह्यातील धामण गावात आल्यानंतर त्यांच्यावर जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी खासदार डॉ प्रितम मुंडे, यांच्यासह माझी आमदारांनाही उपस्थिती दर्शवली तर मोठ्या संख्येने कार्यकर्तेही उपस्थित होते. यावेळी सत्काराला उत्तर देताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मला आठवतेय मुंडे साहेबांनी अचानक विधानसभेची उमेदवारी जाहीर केली अन् त्यांची आज्ञा मी कधीच खाली पडू दिली नाही, त्यानंतर अवघ्या 15 दिवसातच साहेब अचानक गेले. अन् पुढे प्रितम मुंडेंना लोकसभेसाठी उभे केले. प्रितम यांच्यावर ही जबाबदारी सोपवल्यावर त्यांनी मागच्या दोन टर्म जिल्ह्यात चांगल्या प्रकारे काम केले आहे. लोकांच्या प्रश्नांना त्यांनी योग्य न्याय दिला. जिल्हा वासियांनीही त्यांचे काम चोख पार पाडले. मला दिल्लीला पाठवण्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व धामनगावकरांची मी ऋणी असून त्यांचे आभार मानते.
खासदारकी लढवण्याची इच्छा नव्हती
मला खासदारकी लढवण्याची इच्छा नव्हती मात्र पक्षाने मला खासदारकीसाठी निवडले. मी अभ्यासपूर्वक ही निवडणूक लढवणार आहे
बीड जिल्ह्यात मोट बांधण्याचे काम
मला मीडियाने अनेक प्रश्न विचारले. विरोधक कोण असणार आहेत पण येणाऱ्या उमेदवाराला मी माणसाच्या चष्म्यातून बघते असे पंकजा मुंडे यांनी नमूद केले. माझ्या जिल्ह्यात मी तुम्हाला हक्काने मतदान मागणार आहे. मी आपली माऊली आहे. आपल्याकडे मत मागण्याचा माझा हक्क आहे. मी कोणालाही जातीपातीमध्ये वाटले नाही, कोणालाही अभद्र बोलत नाही. त्यामुळे बीड जिल्ह्यात मोट बांधण्याचे काम मी करत आहे.
त्यांना धडा शिकवूया
मी मनापासून तुम्हाला आश्वासन देते. पुढे विधानसभा, जिल्हा परिषदा होणार आहेत. कोणी तरी हे कारस्थान करत आहे अन् समाजातील एकता संपुष्टात आणण्याचे काम करत आहे. आपण सर्व मिळून त्यांना धडा शिकवूया
प्रितम मुंडे यांची काय चूक
प्रितम मुंडे यांनी कोविडच्या काळात पीपीई किट घालून सेवा दिली पण त्यांना आज लोकसभेचे तिकीट दिले नाही. यात त्यांची काय चूक? त्यांचे सर्व सहकारी परत दिल्लीत जाणार अन् प्रितम मुंडे मात्र इथेच राहणार आहेत.
मनोज जरागे यांचे आंदोलन सुरू आहे मी त्यांच्या सोबत आहे. असे मत मराठा आरक्षणाच्या मुद्यावर पंकजा मुंडेंनी व्यक्त केले.