ईडीच्या अटकेला आव्हान देणारी याचिका केजरीवालांनी मागे का घेतली ; कारण काय?
दिल्लीतील दारु घोटाळ्याप्रकरणी तब्बल १० समन्स दिल्यानंतर ईडीने अखेर अरविंद केजरीवाल यांना अटक केली. गुरुवारी रात्री उशिरा केजरीवाल यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे.
त्यानंतर केजरीवाल यांनी अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता केजरीवाल यांनी अटकेला आव्हान देणारी याचिका मागे घेतल्याची माहिती येत आहे.
अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु झाल्यानंतर सीजेआय डीवाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने केजरीवाल यांना स्पेशल बेंचकडे जाण्याचे निर्देश दिले. केजरीवाल यांच्या वतीने ईडीच्या कारवाईविरोधात सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलेलं होतं.
मुख्यमंत्र्यांच्या वतीने वरिष्ठ अधिवक्ता अभिषेक मनू सिंघवी कोर्टासमोर उभे होते. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने त्यांना न्यायामूर्ती संजीव खन्ना यांच्या स्पेशल बेंचकडे जाण्याचे निर्देश दिले. ”जस्टिस संजीव खन्ना यांचं स्पेशल बेंच तुमच्या प्रकरणाची सुनावणी करेल” असं सरन्यायाधीशांनी सांगितलं.
त्यापूर्वी अभिषेक मनू सिंघवी यांनी चंद्रचूड यांच्यासमक्ष याचिकेवर बोलताना या प्रकरणाची सुनावणी लवकरच लवकरच करण्याची विनंती केली. त्यानंतर चंद्रचूड यांनी त्यांनी विशेष बेंचसमोर म्हणणं मांडण्यास सांगितलं. त्यावर तीन न्यायमूर्तींचं खंडपीठ सुनावणी झाली असती. यामध्ये संजीव खन्ना यांच्यासह न्यायमूर्ती एमएम सुंद्रेश आणि न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांचा समावेश आहे.
दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी अटकेविरोधातली याचिका मागे घेतली आहे. खालच्या कोर्टात सुनावणी होणार असल्याने ही याचिका मागे घेतल्याचं केजरीवालांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, केजरीवाल यांनी चौकशीसाठी हजर राहावे म्हणून त्यांना दहाव्यांदा समन्स बजावण्यात आले होते. दिल्ली उच्च न्यायालयाने याच प्रकरणात केजरीवालांना दिलासा द्यायला नकार दिल्यानंतर गुरुवारी सायंकाळी ‘ईडी’चे अधिकारी त्यांच्या घरी जाऊन धडकले. केजरीवाल यांच्या उत्तर दिल्लीतील सिव्हिल लाईन्स येथील निवासस्थानाभोवती कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
‘ईडी’च्या पथकात सात ते आठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. यात सह संचालक कपिल राज तसेच उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता. कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने बंगल्याच्या परिसरात मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.