सूर्यग्रहण 8 एप्रिल रोजी होणार सूर्यग्रहणाआधी अन्नपाण्याचा साठा करण्याचा सल्ला,का केली जात आहे अशी घोषणा?
सामान्यपणे सूर्यग्रहण थेट डोळ्यांनी पाहू नये असं सांगितलं जातं. यामागे वैज्ञानिक कारण आहे. शिवाय सूर्यग्रहणाबाबत लोकांचे कित्येक गैरसमजही आहेत. पण आता मात्र प्रशासनानं सूर्यग्रहणाआधी अन्नपाण्याचा साठा करण्याचा सल्ला दिला आहे.
असं का, सूर्यग्रहणाला असं काय घडणार असे प्रश्न यामुळे निर्माण झाले आहेत.
2024 या वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण 8 एप्रिल रोजी होणार आहे. मेट्रोच्या अहवालानुसार, उत्तर अमेरिकेत ते सर्वात जास्त काळ दिसणार आहे. कॅनडा ते मेक्सिकोपर्यंत सकाळी 11.07 वाजता हे ग्रहण दिसू लागेल आणि ते संध्याकाळी 5.16 पर्यंत राहिल. ग्रहणाआधी टेक्सासमधील हेज काऊंटीमध्ये शाळा बंद करण्यात आल्या आहेत. अनेक पर्यटनस्थळेही बंद राहतील. सूर्यग्रहणाआधी अन्न आणि पाण्याचा साठा करा, अशा घोषणा देत इथले अधिकारी फिरत आहेत. हा सल्ला जितका विचित्र आहे, तितकंच त्यामागील कारणही.
का केली जात आहे अशी घोषणा?
ही नैसर्गिक घटना पाहण्यासाठी लाखो पर्यटक येण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. यामुळे संसाधनांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. लोकांना अन्नपदार्थ मिळण्यात अडचणी येऊ शकतात. तुम्हाला रुग्णालये आणि गॅस स्टेशनवर बराच वेळ थांबावं लागेल. फोन सिग्नल मिळण्यातही समस्या येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या घरातील सर्व महत्त्वाच्या गोष्टी आगाऊ गोळा करा, असे आदेश दिले जात आहेत.
हेस काउंटीचे प्रवक्ते टिम सवॉय म्हणाले, सेंट्रल टेक्सासमध्ये मोठ्या संख्येने लोक येणार आहेत. त्यामुळे लोकांना त्रासापासून वाचवता यावं यासाठी आम्ही विशेष तयारी करत आहोत. स्थानिक लोकांना अन्न आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यास सांगितलं जात आहे.
यंदाचं सूर्यग्रहण आहे खास
चंद्र जेव्हा पृथ्वीभोवती फिरत असतो आणि सूर्य आणि पृथ्वीच्या बरोबर मध्ये येतो तेव्हा पृथ्वीवरून सूर्याचं दर्शन पूर्णपणे होत नाही. चंद्र हा सूर्य व पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा पृथ्वीवर चंद्राची सावली पडते. या सावलीतून दिसणाऱ्या स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात. सूर्यग्रहणाबद्दल फार पूर्वीपासून नोंदी ठेवलेल्या आढळतात. सूर्यग्रहण सर्व साधारणपणे अमावास्येच्या आसपास दिसतं.
या वर्षातील सूर्यग्रहणात सूर्य 11 वर्षांच्या सूर्यचक्राच्या शिखरावर असेल आणि पृथ्वीच्या सर्वात जवळ असेल. नासाच्या म्हणण्यानुसार, ग्रहणाच्या वेळी सूर्य गुंतलेल्या केसांच्या बॉलसारखा दिसेल. शक्यतो संपूर्ण कोरोना दिसेल. सूर्यप्रकाशातील उत्सर्जन चमकदार, गुलाबी कर्ल किंवा लूप म्हणून दिसून येतील. या प्रकारचे सूर्यग्रहण 2017 नंतर अमेरिकेतील पहिले संपूर्ण सूर्यग्रहण असेल.
सूर्यग्रहण सुरक्षितपणे कसं पाहावं?
सूर्याकडून येणाऱ्या प्रखर आणि अतिनील किरणांमुळे (अल्ट्रा व्हायोलेट) डोळ्यांना इजा होऊ नये म्हणून ग्रहण उघड्या डोळयांनी पाहू नये. सूर्यग्रहण पाहण्यासाठी कायम सुरक्षित पद्धतींचाच वापर करावा. यासाठी बाजारात मायलर फिल्मपासून तयार करण्यात आलेले चष्मे वापरावे. यांची किंमत रुपये 200पासून असते. सध्या बाजारात काही बनावटही चष्मे मिळतात. त्यामुळं नीट तपासून हे चष्मे खरेदी करावेत. त्याचबरोबर घरात जर वेल्डिंगसाठी वापरण्यात येणारी काच असेल तर या काचेचा वापर करूनही तुम्ही कंकणाकृती सूर्यग्रहण पाहू शकता.