“आम्हाला युद्ध नकोय”, तालिबानने डोळे वटारुन पाहताच पाकिस्तानची घाबरगुंडी …
पाकिस्तान आणि तालिबानमध्ये मागील काही दिवसांपासून युद्धसदृश परिस्थिती आहे. आधी दहशतवादी हल्ल्याचा आरोप करत पाकिस्तानी लष्कराने अफगाणिस्तानात घुसून हवाई हल्ला केला, ज्यामध्ये तीन मुलांसह आठ जणांना जीव गमवावा लागला.
पाक-अफगाण सीमेवर तालिबानने पाकिस्तानी लष्करावर गोळीबार केल्याची माहिती मिळाली आहे. यातच आता, गुरुवारी पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. ख्वाजा आसिफ म्हणाले की, इस्लामाबादला काबूलसोबत युद्ध नको आहे. पाकिस्तान सरकारचे हे वक्तव्य तालिबानच्या धमकीनंतर आले आहे, ज्यामध्ये तालिबानने गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला होता.
इस्लामाबादला काबूलसोबत कोणत्याही प्रकारचे युद्ध नको आहे, असे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी गुरुवारी सांगितले. “आम्हाला अफगाणिस्तानशी युद्ध नको आहे आणि बळाचा वापर हा शेवटचा उपाय आहे,” असे असिफ यांनी व्हॉइस ऑफ अमेरिकाला सांगितले. तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) आणि अफगाणिस्तानमधील इतर प्रतिबंधित संघटनांकडून पाकिस्तानमध्ये वाढत्या दहशतवादी (Terrorist) हल्ल्यांमुळे दोन्ही शेजारी देशांमधील तणाव लक्षणीयरीत्या वाढला असताना संरक्षणमंत्र्यांचे हे वक्तव्य आले आहे.
यापूर्वी, सोमवारी पाकिस्तानने (Pakistan) गुप्तचर माहितीच्या आधारे अफगाणिस्तानमध्ये कारवाई केली होती. टीटीपीच्या हाफिज गुल बहादूर गटाला लक्ष्य करण्यात आले. पाकिस्तानी लष्कराचा आरोप आहे की, उत्तर वझिरीस्तानमध्ये 16 मार्च रोजी झालेला हल्ला आणि इतर अनेक दहशतवादी हल्ल्यांसाठी टीटीपी जबाबदार आहे. पाकिस्तानी लष्करावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर इस्लामाबादने ही कारवाई केली. या दहशतवादी हल्ल्यात लेफ्टनंट कर्नल आणि कॅप्टनसह सात पाकिस्तानी सैनिक मारले गेले.
अफगाणिस्तानमधील पाकिस्तानच्या लष्करी कारवाईला वाढत्या सीमापार दहशतवादाच्या विरोधात एक महत्त्वाचा संदेश म्हणून वर्णन करुन, आसिफ यांनी तालिबान सरकारला टीटीपीवर नियंत्रण ठेवण्याचे आणि पाकिस्तानविरुद्ध युद्ध सुरू करु न देण्याचे आवाहन केले आहे. “आम्ही हे चालू ठेवू देऊ शकत नाही आणि जर टीटीपीने पाकिस्तानवर हल्ले सुरुच ठेवले तर इस्लामाबादला प्रत्युत्तर देण्यास तयार आहे,” असेही ते पुढे म्हणाले.