खळबळ उडवणारी घटना,बापाने मुलाला बांधून ठेवत डोक्यावर रॉडने जबर वार करीत क्रूर हत्या केली
मनोरुग्ण मुलाच्या सततच्या त्रासाला कंटाळून संतापलेल्या बापाने मुलाला बांधून ठेवत डोक्यावर रॉडने जबर वार करीत क्रूर हत्या केली. ही खळबळ उडवणारी घटना अल्लीपूर पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या कात्री गावात रविवारी (ता.१७) मध्यरात्रीनंतर घडली. मॉन्टी फुलमाळी (२४) असे मृताचे नाव आहे. तर गिरिधर फुलमाळी (६२) असे अटक केलेल्या आरोपी वडिलाचे नाव आहे.
अल्लीपूर पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला असून आरोपी वडिलास अटक करून गुन्हा दाखल केला. गिरिधर फुलमाळी यांच्याकडे चार एकर शेत आहे. पारंपरिक शेतीचा व्यवसाय करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते.
मात्र, त्यांचा मनोरुग्ण मुलगा मॉन्टी याचा चांगलाच त्रास होता. अश्लील शिवीगाळ करणे, उद्धट बोलणे याचा गिरिधर व त्यांची पत्नी यांना चांगलाच मनस्ताप होता. काही दिवसांपूर्वी मनोरुग्ण मॉन्टीने त्याच्या लहान भावालाही चांगलेच बदडले होते. त्यामुळे आई-वडिलांनी त्यास पुणे येथे पाठविले. मॉन्टीचा घरच्यांसह परिसरातील नागरिकांनाही त्याचा मोठा त्रास होता. मनोरुग्ण मॉन्टीच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर वडील गिरिधर यांनी मॉन्टीच्या डोक्यावर रॉडने जबर वार करून त्याची हत्या केली.
घटनेची माहिती अल्लीपूर पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक प्रफुल डाहुले, विनोद बुरीले यांनी कात्री गाव गाठून पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वर्धा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. पोलिसांनी आरोपी वडिलास अटक करून गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे कात्री गावात खळबळ उडाली आहे.
आधी रॉडने मारले नंतर फासावर लटकवले
मनोरुग्ण मुलामुळे संतप्त झालेल्या वडिलाने मनोरुग्ण मुलाला खुर्चीला बांधून त्याच्या डोक्यावर रॉडने जबर वार करीत रक्ताच्या थारोळ्यात पाडले; मात्र तरीही मुलगा जिवंत असल्याचे समजताच त्याच्या गळ्यात दोरी बांधून त्याला फासावर लटकवून निर्दयीपणे हत्या केली.